मला विसरून जगण्याचा तुलाही त्रास होतो ना…?
नको तो हट्ट धरण्याचा तुलाही त्रास होतो ना… ?
उमाळा भावनांचा दाबुनी मी वावरत असते,
हसू ओठी मिरवण्याचा तुलाही त्रास होतो ना…?
कधीतर व्यक्त हो अन् प्रेम आहे मान्यही तू कर.
असा आतून कुढण्याचा तुलाही त्रास होतो ना…?
अताशा सावराया लागलेलो एकमेकांना
अशातच हात सुटण्याचा तुलाही त्रास होतो ना…?
जगाला सांगते मी “छान आहे चालले सगळे.”
स्वतःलाही फसवण्याचा तुलाही त्रास होतो ना…?
तुझे आभाळ डोळ्यातून माझ्या दाटते हल्ली.
असे रोजच बरसण्याचा तुलाही त्रास होतो ना…?
दिवा लावून अंधारात मी नुसतीच मिणमिणते.
अशा कैफात विझण्याचा तुलाही त्रास होतो ना…?
तुझ्यावाचून कुठले चित्र मजला आवडत नाही.
अताशा चित्र बघण्याचा तुलाही त्रास होतो ना…?
पुन्हा हा जीव लावू वाटलेले. पण, नको आता;
पुन्हा प्रेमात पडण्याचा तुलाही त्रास होतो ना…?
पूजा भडांगे –
संग्रह @अजित नाडकर्णी शुभांजित श्रुष्टि
