भाजपचा अधिकृत उमेदवारी अर्ज उद्या किंवा सोमवारी; युवराज लखमराजे भोसले
सावंतवाडी :
सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांना भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी शुक्रवारी दुपारी आपल्या कुटुंबीयांसह नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, यांच्यासह डॉ. सतिश सावंत, देसाई, कृष्णा राऊळ आदी उपस्थित होते.
निवडणूक कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
दरम्यान सोशल मीडियावर उमेदवारी अर्ज दाखल करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर युवराज लखमराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी भाजपाच्या एबी फॉर्म सह २१ जणांच्या उपस्थित अधिकृत उमेदवारी अर्ज उद्या किंवा सोमवारी अखेरच्या दिवशी दाखल करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
