*गलिच्छ राजकारणामुळे राजकीय पक्षांकडे समाजमान्य प्रतिष्ठित उमेदवारांची वानवा…?*
“आम्ही सर्व खर्च करतो, फक्त तुम्ही हो म्हणा…” अशी गळ घालून देखील “आम्हाला आजचे घाणेरडे राजकारण नको आणि पैशांचे खेळ करणे आमच्या हिंमतीत नाही की, मनाला पटत नाही…
अशी सज्जन कारणे देत हसत हसत समोरून निवडणुकीत उभे राहण्यासाठीची येणारी मोठ्या पक्षांची ऑफर देखील नाकारली जाते, त्यांना लोकांच्या मनातील चेहरा काही वॉर्ड मध्ये मिळत नाही ही देशात, राज्यात श्रेष्ठ समजणाऱ्या राजकीय पक्षांसाठी दुर्दैवाची गोष्ट म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही “एकाला चलो रे” ही ताठर भूमिका ठेऊन प्रत्येक पक्ष आपलीच लक्तरे वेशीवर टांगण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. एवढी दयनीय अवस्था आज राजकीय पक्षांची का झाली आहे…? याचा अभ्यास राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नक्कीच करावा, अन्यथा भविष्यात सुशिक्षित लोक निवडणुकांकडे दुर्लक्ष्य करतील किंवा नेपाळ सारखी परिस्थिती भारतीय लोकशाहीमध्ये पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.
निवडणुका लागल्या की राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या प्रमाणापेक्षा वाढत असते. त्यातही महत्त्वाचे म्हणजे युती, आघाडी झाली तर नाराजांची संख्या सुद्धा एवढी वाढते की, त्यातील कित्येकजण घरदार गहाण ठेऊन देखील अपक्ष उभे राहतात, कुणी राजीनामे, गद्दारी, पक्षांतर अशी विविध आभूषणे परिधान करून निवडणुकीचा कडू घोट गोड मानून पितात आणि उर्वरित आयुष्य कर्ज फेडण्यात घालवतात. कारण, या स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीत विजयी होणे हे अनेकांसाठी केवळ प्रतिष्ठेचा विषय असतो. काहीजण दुनियादारी करून अनेकांना पुरून उरलेले असतात तेवढेच धुरंदर राजकीय पदांचा उपयोग करून घेतात आणि गेलेल्या पैशापेक्षा जास्त पैसा कमावतात. अर्थात राजकारण किंवा राजकीय पद हा त्यांच्यासाठी धंदा असतो. पण, यामध्ये काहीजण मात्र समाजसेवेच्या उद्देशाने येतात ते मानसन्मान कमवून स्वतःच्या खिशाला कात्री लावून घेतात.
आजकाल निवडणूक हा सर्वसामान्य इच्छुक उमेदवारांसाठी साधा सरळ विषय राहिला नाही. “पैसा फेको तमाशा देखो”…. या वृत्तीमुळे समाजातील प्रतिष्ठित लोक राजकारणापासून चार हात दूरच राहिले आहेत. गेली काही वर्षे सभा असो की, राजकीय रॅली माणसे ही पैसे देऊनच आणली जातात. क्वचित प्रसंगी राज ठाकरेंसारख्या वक्त्याला ऐकण्यासाठी किंवा सभेची गर्दी पाहण्यासाठी लोक स्वतःहून येतात. काही शिवसेनेसारख्या एखाद्या पक्षाचे कट्टर कार्यकर्ते पुढच्या खुर्च्या अडवतात. पण, पूर्वी बॅरि.नाथ पै, मधु दंडवते अशा दिग्गजांची भाषणे ऐकण्यासाठी लोक उन्हातान्हात बसून असायचे. आजच्या पुढाऱ्यांचीच दयनीय अवस्था असल्याने आणि निवडून येण्यासाठी आमिषे दाखविण्याची सवय आजकालच्या लोकप्रतिनिधींनीच लावल्याने बराचसा मतदार “राजा” भाषणे ऐकण्यासाठी स्वतःहून येत नाही तर त्याच्या सोबत वडापाव आणि बिना काठीचा कागदावरचा गांधी द्यावा लागतो. हीच परिस्थिती मतदानासाठी या मतदार राजाला घरातून बाहेर काढताना असते. काहीजण घरातच बसून असतात. “आमची आठ मतं आहेत, अमुक येऊन अमके हजार देतो बोलून गेला. तुम्ही किती देता ते सांगा” अशी निर्लज्जपणाची भाषा करतात… अक्षरशः स्वतःला वेश्येप्रमाणे बाजारात उभे करतात आणि याला कारणीभूत आपलेच लोकप्रतिनिधी आहेत जे मतदार विकत घेऊन निवडून येण्याची स्वतः स्वप्ने पाहतात आणि मतदारांना पैसे, सहलींची स्वप्ने दाखवतात. परंतु या सर्व विक्री खरेदी व्यवहारात भरडले जातात ते सर्वसामान्य आणि सर्वमान्य असलेले स्वाभिमानी प्रामाणिक उमेदवार. अलीकडे निवडणुकांचा स्तर एवढ्या खालच्या पातळीवर गेला आहे की, अगदी नाथ पै, मधु दंडवते जरी आज निवडणुकीसाठी उभे राहिले तरी निवडून आले नसते. त्यामुळे अशा पैशांच्या बाजारावर चालणाऱ्या निवडणुकांमध्ये उभे राहण्यासाठी सोडाच मत देण्यासाठी सुद्धा स्वाभिमानी, चांगल्या घरातील स्त्री, पुरुष भाग घेण्यापासून दूर राहू लागले आहेत. त्यामुळे सोज्वळ, चारित्र्यवान, समाजात पत असलेला समाजमान्य उमेदवार मिळणे म्हणजे राजकीय पक्षांसाठी तारेवरची कसरत झाली आहे.
स्वतंत्र निवडणूक लढविणे ही आज प्रत्येक पक्षासाठी गद्दारी किंवा कार्यकर्त्यांमध्ये पडणारी फूट टाळण्यासाठी महत्त्वाची वाटू लागली आहे. त्यामुळे इच्छुक असणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या वॉर्ड मध्ये उभे राहण्याची संधी मिळू शकेल अशी नेत्यांची समजूत आहे. परंतु इथे सर्वात मोठी गोम आहे ती म्हणजे प्रत्येक वॉर्ड मध्ये निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवार मिळणे..! पाच वर्षे सत्तेत असणारे नगरसेवक इतर कोणाशी जास्त संपर्क ठेवत नाहीत किंवा भविष्यात कोणी स्पर्धेत येऊ नये म्हणून हरहुन्नरी हुशार लोकांना सामाजिक कार्यापासून दूर ठेवतात. त्यामुळे जेव्हा निवडणुकीत विशिष्ट समाजाचे आरक्षण पडते तेव्हा उमेदवार शोधण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर येते. मग वॉर्ड मध्ये चांगली ओळख, मत, प्रतिमा असणाऱ्या व्यक्तींना आपल्या पक्षात येण्याची, पद, मानसन्मान देण्याची तयारी दर्शविली जाते. एवढेच काय तर नगरसेवक म्हणून निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी देखील घेतली जाते.
हे कशासाठी…? यांच्याकडे चांगली माणसे का उमेदवार म्हणून स्वतःहून येत नाहीत..? यांना समाजात प्रतिमा, प्रतिष्ठा असलेले उमेदवार का शोधावे लागतात..? ऐनवेळी मिळेल त्याच्या गळ्यात माळा का घालावी लागते…?
हेच नव्हेत असे अनेक प्रश्न आजच्या घडीला सुरू असलेल्या राजकारणामुळे अनेकांच्या मनात उत्पन्न झाले आहेत.
पैशाने मते विकत घेता येतात, मतदार देखील विकत घेता येतील..पण, समाजात प्रतिमा, प्रतिष्ठा असलेले उमेदवार विकत घेता येणार नाहीत हे मात्र तितकेच खरे…!
