*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित काव्याचे कवयित्री राधिका भांडारकर यांनी केलेलं रसग्रहण*
*दु:ख वाटे चावळावे*
“पदरात निखारे असले तरी ओठावर मात्र हास्य असावे.”
आजही समाजात स्त्रीची हीच प्रतिमा आहे किंबहुना समाजाला स्त्रीचं हेच रूप अपेक्षित आहे, मान्य आहे.
हजारो वर्षांपासून स्त्रीच्या दुःखात, वेदनेत, समस्येत फारसा मूलभूत फरक झालेला जाणवत नाही आणि असलाच फरक तर तो केवळ एक मुलामा आहे. खोटा, वरवररचा. आत मध्ये मात्र तेच जळणं, तोच अंगार. अशाच अर्थाची, माननीय कवयित्री सौ.सुमती पवार यांची “दुःख वाटे चावळावे..” ही स्त्री वेदना व्यक्त करणारी आणि मनातले धुमसणारे निखारे फुलवणारी एक अतिशय वास्तववादी सुरेख कविता वाचनात आली. याच कवितेचा रसास्वाद आज आपण घेऊया.
*दु:ख वाटे चावळावे*….
सुखदु:ख वाटे चावळावे, चघळती त्या बायका
चटके मनावर ओरखडे दाविती ना बायका..
ते रोज मरणे रोज जगणे मार बुक्यांचा बसे
लावूनी कुलूपे बसती त्या का करूनी घ्यावे वाटे हसे?
परी फुटतो बांध अवचित कधी पाणवठी वा वावरी
संताप होतो व्यक्त कृतीतून रडवेली होते, हासरी..
खोचून काचा साडीचा तो आपटून कापडे
साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे..
बरसती अंगारासवे नयनातूनी लाह्या जणू
आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू..
मोकळे मग आकाश होते पिळुनी आणखी मुक्त
ते
घेऊन उसना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते..
कधी न कळते अथवा वळते गेंडासमाजास ती
बंद ओठांवरही चालते रानटी मिजास ती…
वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती
पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते सारी रिती..
रानटी तो प्राक्तनाचा लिहिणारा धनी असे
काय जळते कोणाचे ते अनुभवावाचूनी ….
कळणार कसे?….
*प्रा.सौ.सुमती पवार नाशिक*.
ही कविता वाचल्यानंतर प्रथम डोळ्यासमोर येते ती संसाराचा गाडा निमुटपणे, विनातक्रार, कष्टाने, मानहानी सोसत ओढणारी एक ग्रामीण स्त्री! तिचं जग म्हणजे गावचा पाणवठा, नदीचा किनारा अन् तिथेच भेटणारी समदु:खी माणसं!
सुखदुःख वाटे चावळावे चघळती त्या बायका
चटके मनावर ओरखडे दाविती ना बायका
कशा असतात बायका! जरी कितीही वाटलं चुकतमाकत, तुटकपणे, अडखळत का होईना मनातलं खुपणारं जगाला सांगावं पण दुःख गिळण्याची सवय लागलेल्या या स्त्रिया स्वतःच्या मनावरचे चटके, ओरखडे लपवतच राहतात. आहे त्या परिस्थितीत जगत राहतात.
कवितेच्या या पहिल्या चरणात स्त्री कशी शोषित आहे याचं दर्शन होतं. *चावळावे* *चघळतती* हे शब्द तोच काव्यभाव अत्यंत परिणामकारक पद्धतीने व्यक्त करतात.
ते रोज मरणे रोज जगणे मारबुक्क्यांचा बसे
लावूनी कुलूपे बसती त्या करून घ्यावे वाटे हसे?
कधी शब्दांचा, कधी शारीरिक लाथा बुक्क्यांचा मार खात जगणं म्हणजे एक प्रकारचं रोजचं मरणच पण तरी “हाताची घडी आणि तोंडावर बोट” या पद्धतीने कुठेच व्यक्त व्हायचं नाही, बोलायचं नाही कारण बोललं, तक्रार केली तर त्यातून साधणार काहीच नाही. बदनामी मात्र होणार. हे कायमस्वरूपी भय उराशी बाळगतच ही अत्याचारित स्त्री जगत असते पण कधीतरी याचा स्फोट होतोच ना? अति होतं आणि बांध फुटतो.कसा? कशा रीतीने? त्याचं काळीज फाटणारं वर्णन कवयित्रीने पुढच्या चरणात केलं आहे.
तरी फुटतो बांध अवचित कधी पाणवठी वा वावरी
संताप होतो व्यक्त कृतीतून
रडवेली होते हासरी..
गावात एखादा पाणवठा असतो. नदीचा किनारा असतो अथवा एखादं शेत असतं जिथे ती मोलमजुरी करते. ही सारी ठिकाणं म्हणजे तिच्यासाठी कधीतरी मन मोकळं करण्याची माध्यमं असतात. साऱ्याच पीडित असतात म्हणूनच एकमेकींची सुखदुःखं जाणू शकतात. रडवेली मनं मोकळी होतात. क्षणभर का होईना तिच्या मुखावर मग हास्य विलसते.
तिच्या मनातली खदखद, संताप कसा कृतीतून व्यक्त होतो त्याचं बोलकं चित्र सुमतीताई पुढच्या चरणात आकारतात.
खोचून काचा साडीचा तो आपटून कापडे
साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे
ढीगभर धुणं घेऊन ती पाणवठ्यावर आलेली आहे.धुताना कपडे दगडावर आपटत असताना तिच्या मनातला संताप, उद्विग्नता तडतडणार्या ठिणग्यांप्रमाणे बाहेर पडते. जसा कपड्यातून मळ बाहेर येतो तसाच तिच्या मनातही कित्येक दिवस साठलेला मळ,कचरा बाहेर पडतो.
या चरणात “कापडं धुणं” हे अतिशय चपखलपणे रूपकात्मक पद्धतीने कवयित्रीने इथे मांडलं आहे. जशी एखादी पंचींग बॅग असावी.
स्त्री जीवनाशी निगडित असलेली ही रोजची सर्वसाधारण कृती तिच्या दुःखाला वाट फोडणारंं एक प्रभावशाली माध्यम कसं होऊ शकतं हे अत्यंत साध्या तरीही परिणामकारक शब्दात कवयित्री सुमतीताईंनी मांडलं आहे. हा चरण वाचताना अंगावर अक्षरशः शहरा येतो आणि कुठेतरी मनाला काटेही बोचतात.
बरसती अंगारासवे नयनातूनी लाह्या जणू
आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू
मोकळे मग आकाश होते पिळुनि आणखी मुक्त ते
घेऊन उसना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते
एकीकडे ती आपटून धोपटून कपडे धूते, त्यातला मळ काढते आणि शेवटी ते घट्ट पिळते.ही प्रत्येक कृती प्रतिकात्मक आहे. तिच्या मनात साठलेला प्रचंड संताप, उद्रेक, चीड या प्रत्येक कृतीतून अगदी स्वाभाविकपणे बाहेर पडते. तिच्या मनात फुटणाऱ्या त्या संतप्त विचारांच्या लाह्या टणटणतात. तिच्या डोळ्यातून अश्रू ही ओघळत राहतात. वाहत्या पाण्यात तेही सामावून जातात. जशी नदी सागराला मिळावी त्याप्रमाणे. तिचे अश्रू त्या पाण्याशी एकरूप होतात. तो पाण्याचा प्रवाह तिच्या अश्रूंना उदरात घेतो. अशा रीतीने तीही मुक्त होते! मोकळी होते.” झालं मोकळं आभाळ” अशी तिची हलकी मनस्थिती होते आणि मग ती पुन्हा तिचा तोच उसना हसरा चेहरा घेऊन घरी परतते.
या काव्यपंक्ती वाचताना वाचकांचे मन भळभळतं. इथे “स्वभावोक्ती” अलंकार अतिशय सुंदरपणे कवयित्रीने साधलेला आहे. पाणवठ्यावर धगधगणारं मन घेऊन कपडे धुणारी ही व्यथित ग्रामीण स्त्री अक्षरश: डोळ्यासमोर साकारते. आणि नकळत तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आपण पुसावेत असे वाचकालाही वाटते.
कधी न कळते अथवा वळते
गेंडा समाजास ती
बंद ओठावरही चालते
रानटी मिजास ती..
वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती
पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते
सारी रिती…
समाज इतका बोथट, बथ्थड, संवेदन शून्य आहे की त्याला तिचं दुःख कळून घ्यायचंच नाही, कळलं तरी वळत नाही अशीच या भावना शून्य समाजाची स्थिती आहे. उलट स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू. तिला मन आहे, तिच्यात एक आत्मा आहे याची ना दखल ना जाणीव. काय होतं तिच्या साचून ठेवलेल्या यावेदनांचं? फक्त एक वळकटी. आयुष्य सरतं. अखेर करकचून बांधलेली वळकटी धगधगत्या चितेतच रिकामी, निवांत होते. आयुष्यभर जळणाऱ्या तिच्या दुःखाला मरण हाच एकमेव जणू आसरा असतो, थांबा असतो. तिच्या मरणातच तिची शांती असते.
रानटी तो प्राक्तनाचा लिहिणारा धनी असे
काय जळते कोणाचे ते अनुभवावाचूनी कळणार कसे
शेवटच्या चरणात मात्र हतबलता, हताशपणा जाणवतो. ज्या कुणाच्या गळ्यात ती तिच्या आयुष्याची माळ घालते तो तिचा धनीच तिचे भागधेय ठरवतो. तिच्या नशिबाची रेषा तोच आखतो आणि ती निमुटपणे, मिटल्या इंद्रियाने सारे स्वीकारते. तिच्या जळण्याने कुणाचे काही जळत नाही, बिघडत नाही. तिच्या दुःखापर्यंत खरं म्हणजे कोणीच पोहोचत नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अनुभव नसलेल्यांना ते कसे जाणवणार? त्यांची फक्त वरवरची सहानुभूती असेल. त्यात थोडीच अंतःकरणाची तडतड असेल?
संपूर्ण मुक्तछंदातली ही कविता वाचल्यानंतर मन कमालीचं सुन्न होतं.या कवितेत एक उपहास आहे जो मन फाडणारा आहे. मात्र कवयित्री सुमती ताईंच्या प्रत्येक शब्दातून झिरपणारी तिची वास्तववादी व्यथा, “स्त्रीचं मन एक स्त्रीच जाणू शकते.” या निष्कर्षापर्यंत नक्कीच आणून सोडते. शिवाय या कवितेतली वेदना, व्यथा मोठी की ती व्यथा जीवनभर सोसणारी सोशिक स्त्री मोठी हे ठरवता
येत नाही पण तरीही या कवितेतून पाझरणारं जे स्त्रीरूप आहे ते कधी बदलेल का? बदलता येईल का? हा प्रश्न मात्र मनात उभा राहतो.कवितेतील गावकुसाकडची स्त्री समस्त पीडित नारीजाततीचंच अशाप्रकारे प्रतिनिधीत्त्व करते.
*राधिका भांडारकर*
