*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*
*सामाजिक चळवळी विसावतांना*
भारत देशामध्ये महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. याच महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पुरोगामी संत म्हणून जगभर ओळख आहे.
राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री माता फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज, शाहीर अण्णाभाऊ साठे, शब्दर हाश्मी पासून नरेंद्र दाभोळकरांच्या पर्यंत. सोबत अनेक दिग्गज शाहीर, कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते, परिवर्तनवादी चळवळी चालविलेले हजारो स्वयंसेवक, असे अनेक महापुरुष याच महाराष्ट्राला लाभलेले आहेत.
महाराष्ट्रातील पुणे येथील पवित्र पुण्यभूमीमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा महात्मा ज्योतिराव फुले, आणि सावित्रीमाता फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. नीती भ्रष्ट झालेल्या धर्म व्यवस्थेनी नाकारलेल्या स्त्रियांना शिक्षणाची मुख्य द्वारे खुली करून दिली.
याच महाराष्ट्र मध्ये दलित हक्कांच्या झालेल्या चळवळी. पाण्यासाठी झालेली आंदोलने. स्त्री पुरुष समानतेसाठी झालेल्या मोठमोठ्या चळवळी. भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक माणसाला दिलेला संवैधानिक अधिकार.त्या अधिकाराचा झालेला महाराष्ट्रभर जागर. ही सर्व मुल्य घेऊन जनजागृती करण्यासाठी कलापथक, परिवर्तन गीते, मोर्चे, आंदोलने, सत्याग्रह, उपोषणे, पोस्टर प्रदर्शन, शाहिरी कार्यक्रम, जलसे, पथनाट्य, वगनाट्य, विविध प्रकाराच्या माद्यमातून चळवळी, आंदोलने मानवी हक्क,स्त्री पुरुष विषमता धार्मिक, जातीय भेदभाव नष्ट करणारे काव्य असतील. काव्य मैफिल असतील, अनेक माध्यमांचा वापर करून महाराष्ट्रामध्ये छोट्या-मोठ्या अनेक चळवळी झाल्या. म्हणून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रगती आम्ही करू शकलो, म्हणून तर महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधलं जातं.
सामाजिक, राजकीय, धार्मिक, आणि संत संप्रदायामध्ये अनेक महापुरुष या महाराष्ट्राला लाभलेले आहेतं.
हा सर्व पुरोगामीत्वाचा विचार दोन हजार साला पर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजासमोर आपली प्रतिमा उंचावताना दिसत होता. दोन हजार सालानंतर सामाजिक पुरोगामी चळवळी हळूहळू थंड होताना दिसत आहेत. कुठेही चळवळीची गाणी दिसत नाहीत. शाहिरीचे कार्यक्रम दिसत नाहीत. समाजातल्या प्रश्नावरती आवाज उठवणारे मोर्चे, आंदोलने दिसत नाहीत.
जातीय अत्याचार, महिला अत्याचार, बालकांचं शोषण, स्त्री पुरुष विषमता अशा अनेक प्रश्नांना सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी बगल दिल्याचे दिसते आहे. डोळे असून आंधळ्याचं सोंग घेणारे कार्यकर्ते तर निर्माण होत नाहीत ना याची मात्र नक्की शंका येत आहे. ही बगल देणे भविष्यकाळात महाराष्ट्राला भोगाव लागेल. असेच आता तरी वाटत आहे.
एका बाजूला रसातळाकडे जाणारी गरीबी आणि दुसऱ्या बाजूला कोठ्यावधीची प्रॉपर्टी असणारे लोक, ही आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सोबत निसर्गाचा वाढत जाणारा असमतोल हाही विषय गंभीर होताना दिसत आहे. आला पाऊस तर धो धो करून येत राहतो. माती वाहून जाते. पिकं वाहून जातात. अतोनात नुकसान होऊन शेतकरी हतबल होतो.आणि गेला म्हणजे तीन तीन वर्ष दुष्काळ पडतो. झाडाला पान नाहीतर फांदी सुद्धा राहत नाही. ही सर्व बदलत जाणारी स्थित्यंतर ही विचार करायला लावणारी आहेत. जी भविष्यकाळात आपल्याला माफ करणार नाहीत.
महाराष्ट्राचं पुरोगामीत्व आबाधीत राहण्यासाठी झालं तर सामाजिक चळवळी जिवंत राहणे अत्यंत आवश्यक आहे. विचार जिवंत राहणं आवश्यक आहे. कार्य जिवंत राहणं आवश्यक आहे. इथली धर्म व्यवस्था, राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, ही समतेच्या पातळीवरती चालणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वधर्म समभावाचा विचार माणसांच्या मनामनामध्ये पेरण अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर भविष्यकाळ हा भारतीय ऐकतेला खिंडार तर पाडणार नाही ना असे नक्कीच आज वाटते आहे.
म्हणून सामाजिक चळवळी ह्या कार्यरत असायला हव्यात. बुडते जग, पहावे न डोळा, येतो कळवळा देखोनिया. अशी गत आमच्यासारख्यांची झालेली दिसते.
इथे शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी खूप मोठी क्रांती होणे आवश्यक वाटते, बंद होत चाललेल्या गरिबांच्या शाळा हा प्रश्न आता आ..वासून उभा आहे. परंतु याकडे चळवळीचं दुर्लक्ष झालेले दिसत आहे. तांडा, वाढी, वस्तीवर जे शिक्षण पोहोचायला हवं. दर्जेदार शिक्षण मिळायला हवं. याकडे पूर्ण महाराष्ट्राचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. नाहीरेंचा आवाज कायम जिवंत असणे आवश्यक आहे. नाहीतर येथे शोषण होईल. आणि पुरोगामी महाराष्ट्राचं नाव कुठेतरी दप्तरात जमा होईल. अशीच स्थिती आज झालेली आहे.

