You are currently viewing सावंतवाडीतील ऐतिहासिक ‘माठ्याची जत्रा’ उद्या

सावंतवाडीतील ऐतिहासिक ‘माठ्याची जत्रा’ उद्या

सावंतवाडीतील ऐतिहासिक ‘माठ्याची जत्रा’ उद्या —

राजघराण्याच्या स्मशानभूमीत पारंपरिक विधींसह होणार उत्सव

सावंतवाडी (प्रतिनिधी) :

सावंतवाडी शहरातील एकमेव आणि ऐतिहासिक जत्रा म्हणून ओळखली जाणारी राजघराण्याच्या स्मशानभूमीतील ‘माठ्याची जत्रा’ उद्या, १४ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. राजेसाहेब खेमसावंत तिसरे यांच्या माठ्यात सकाळपासून धार्मिक विधी पार पडतील, तर दुपारपासून दर्शनासाठी माठ खुला करण्यात येणार आहे.

या जत्रेची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, जिल्ह्यातील इतर जत्रा रात्रीच्या वेळी भरत असल्या तरी माठ्याची जत्रा सकाळीच भरते आणि रात्री तिचा समारोप होतो. शहरासह परिसरातील ग्रामस्थ या जत्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. संस्थानच्या वीर वंशजांचे स्मरण या जत्रोत्सवात केले जाते.

सावंतवाडी संस्थान हे भारतातील ४८ संस्थानांपैकी एक असून, सुमारे ४०० वर्षांचा इतिहास त्यामागे आहे. पहिले खेम सावंत यांनी शौर्याने आजूबाजूचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणून ‘चराठे’ म्हणजेच आजची सावंतवाडी येथे राजधानी स्थापन केली. दुसऱ्या खेम सावंत यांनी शहर वसवले.

इ.स. १७५५ मध्ये राजा रामचंद्र सावंत यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र खेम सावंत तिसरे (राजश्री) यांना राज्याधिकार प्राप्त झाला. हे राजा विद्याप्रेमी, दानशूर आणि लोकहितैषी होते. त्यांच्या काळात अनेक देवस्थानांना व लोकांना इनामे, जमिनी व रोख रकमा देण्यात आल्या. आजही सावंतवाडी संस्थानातील अनेक इनामे त्यांच्या काळातील असल्याचे आढळते. याच काळात प्रसिद्ध श्री देव आत्मेश्वर देवस्थान उभे राहिले, तर मंदीरासमोरील ऐतिहासिक तळीला देखील त्यांच्या कारकीर्दीचा वारसा लाभला आहे.

राजघराण्याच्या स्मशानभूमीत होणारी ही माठ्याची जत्रा सावंतवाडीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानली जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा