लोरे नं. १ येथे अनधिकृत उत्खननाविरोधात ग्रामस्थांचा तहसीलदारांकडे निवेदन
कणकवली (प्रतिनिधी) :
लोरे नं. १ येथील ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग मायनिंग अँड मिनरल्स इंडस्ट्रीज या संस्थेमार्फत सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननाविरोधात तहसीलदार कणकवली यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मनोज तुळशीदास रावराणे यांच्या मालकीच्या जागेवर या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात सिलिका वाळूचे उत्खनन सुरू आहे. सदर ठिकाणासाठी खानपट्ट्याची मागणी करण्यात आली असली तरी शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी नसतानाही अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या या उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल, शेतीक्षेत्र आणि ग्रामस्थांच्या आरोग्य व सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालय, खाणीकर्म विभाग आणि तहसील कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे. उलट, मागील काही दिवसांत उत्खननाचा वेग वाढला असून सिलिका वाळूची वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ शिष्टमंडळाने अनधिकृत उत्खननाविरुद्ध तात्काळ कारवाई करून संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करावी आणि उत्खनन पूर्णपणे थांबवावे, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा बेकायदेशीर कारवायांना आळा बसावा यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही विनंती करण्यात आली आहे.
निवेदन देणारे ग्रामस्थ प्रतिनिधी:
अमित अरुण रावराणे, विशाल विश्राम राणे, रमेश विश्राम राणे – ग्रामस्थ शिष्टमंडळ, लोरे नं. १, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग.

