*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*अपेक्षाभंग*
॥*कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन*॥
“कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका.” हे गीतेतलं एक महान तत्त्व जे आचरणात आणता आलं तर जीवन नक्कीच सुखदायी होईल. कमी अधिक प्रमाणात माणूस स्वतःला ओढत या तत्त्वाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतही असतो पण तो खरोखरच सफल होतो का हा चर्चेचा विषय आहे.
अपेक्षाभंग म्हणजे निराशा, हिरमोड आणि त्याचीच परिणिती अखेर दुःखात होते मग आपणच आपल्या मनाला बजावतो,” अपेक्षाच ठेवली नाही तर अपेक्षाभंग होण्याचाही प्रश्न नाही.”
दुःखाचं, नैराश्याचं मूळच गेलं तर माणसाच्या जीवनातलं सुखाचं बंद दार आपोआपच उघडलं जाईल पण जगताना पावलोपावली *अपेक्षाभंग* होतच असतात.
“परीक्षेसाठी इतका कस्सून, मन लावून, रात्रीचा दिवस करून अभ्यास केला पण अपेक्षित गुण मिळालेच नाहीत. व्हा दुःखी.
“स्पर्धेत पाठवलेलं आपलं साहित्य कुठलाच क्रमांक मिळवू शकले नाही.” व्हा निराश.
“कठीण समय येता कोण कामास येतो” या वाक्यातसुद्धा एक दडलेला अपेक्षाभंग आहेच. “ज्या व्यक्तीसाठी आपण काय नाही केले,किंवा इतके केले पण आज आपल्यावर वेळ आली तर याने चक्क पाठ फिरवली.” या विचाराने मन खंतावतेच.
“यावर्षी नक्कीच प्रमोशन मिळेल असं खात्रीपूर्वक वाटत असताना दुसराच कोणीतरी भाग्यशाली ठरतो” आणि आपण मात्र नाउमेद होतो.
असे अनेक लहान-मोठे अपेक्षाभंगांचे प्रसंग मनाला सतत गढूळ करत असतात.
“याने फोन तर उचललाच नाही. असेल त्यावेळी व्यस्त तो कशाततरी पण निदान कॉल बॅक तरी करायचा.”
“ एखाद्या जवळच्या स्नेह्याकडे काही सोहळा असतो. मनातल्या मनात आमंत्रण येईलच याची आपण वाटही पाहत असतो आणि एक दिवस दुसऱ्याच कोणाकडून तरी कळते,’ “त्यांच्याकडचा सोहळा किती बहारदार झाला तू कशी दिसली नाहीस?”
आता काय सांगणार?
मला निमंत्रणच नव्हतं?विसरलं गेल्याची,डावललं गेल्याची उद्विग्न भावना तर निर्माण होतेच मग समजूत घालायची स्वत:चीच, “गडबडीत विसरला असेल. होऊ शकतं.”
मात्र अशा प्रसंगाभोवती अदृश्यपणे विणलेली अपेक्षाभंगाची झालर काही मोकळी होत नाही.
“मुलं आता विचारत नाहीत, त्यांना आपल्या परवानगीची गरज वाटत नाही, आपण दिलेले सल्ले त्यांना अगदीच आऊटडेटेड आणि हास्यास्पद वाटतात, एकाच घरात राहून एकाएकी ‘आपण अडगळ झालोय’ ही भावना अशाच दुःखद अपेक्षाभंगातूनच निर्माण होते.
अपेक्षा ठेवायच्या नाहीत हे म्हणणं सोपं आहे पण प्रत्येकाच्या मनात बारीकसारीक अपेक्षांचं विणकाम हे सतत नकळत चालू असतं. आणि स्वतःच विणलेल्या जाळ्यात ती व्यक्ती एखाद्या कोळी कीटकासारखी अडकून जाते हे वास्तव आहे.
तटस्थपणा, स्थितप्रज्ञता, केवळ साक्षी भाव, अलिप्तपणा,निवृत्तभाव या जीवनाच्या खूप उंचावरच्या पायऱ्या आहेत. एखादा पोहोचत असेल पण तरीही त्या एखाद्याबद्दलही माझ्या मनात शंका आहेच. “त्याला तो जसा आहे असं वाटत असलं तरी तो खरंच त्या स्थितीत गेला आहे का? कारण कुठल्यातरी क्षणी त्याच्याही वागण्यात कधीतरी विसंगती आढळतेच. नराचा नारायण नाही होऊ शकत.
*अहिंसा परमो धर्म* असे म्हणतात पण तुमच्या एका गालावर कोणी थप्पड मारली तर तुम्ही उदारपणे दुसरा गाल खरंच पुढे कराल का? माणसाची स्वाभाविक आणि तत्काल प्रतिक्रिया क्रोधाचीच असते.
अपेक्षाभंगातून क्रोध निर्माण होतो. क्रोधाची परिणिती हिंसेत होते, सूडभावनेत होते. अधर्मी, अनैतिक वृत्तीतही त्याचं रूपांतर होऊ शकतं. गुन्हेगारी प्रवृत्तीचं मूळच मुळी कुठल्या ना कुठल्या अपेक्षाभंगात असतं.
“सौम्यते कडून रौद्रत्त्वाकडे नेणारी मानसिकता निर्माण होणे” याचं कारणही अपेक्षाभंगच.
कमालीचे नैराश्य निर्माण होऊन आत्मघाती वृत्तीत परिवर्तित करणारं असं हे महाभयंकर अपेक्षाभंगाचं दुःख असू शकतं. मात्र या भग्न स्थितीचं कारण समजल्यानंतर केवळ त्याचं समर्थन करणं योग्य होणार नाही. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कुठला ते शोधण्याची आस लागलीच पाहिजे.
एकीकडे अपेक्षाभंगाचे दुःख तर दुसरीकडे मनावर संयम ठेवण्याची कसोटी सांभाळता आली पाहिजे.
There is always a second option
OR
NEXT TIME हे काही पर्याय आहेत.
आपले ग्रंथ काय सांगतात, वेद, उपनिषदे, पुराणातले दाखले, यातही मी म्हणेन नका चक्रावून जाऊ. ते पांडित्यही नाही झेपत आपल्याला. फक्त ‘पढतमूर्खच” ठरू आपण.(कृपया वाचकांनी गैरसमज करून घेउ नये,)
“तुमच्या मनाचे शिल्पकार तुम्हीच बना. स्वतः वाटा शोधा. स्वतःत डोकावून पाहण्याची सवय लावा, आत्मभान ठेवा, आपल्याच पंखातली ताकद आजमावून मग झेप घ्या. “अंथरूण पाहून हातपाय पसरा.” अगदी असेच नाही पण अंथरूण किती मोठं होऊ शकतं याचा प्रमाणित अंदाज घ्यावा म्हणजे ठायी ठायी होणाऱ्या अपेक्षाभंगांचे दुःख हलकं राहील. ते निदान पेलवता तरी येईल.
चिमणीला पोहता येणार नाही. बदकाला चिमणी सारखं उंच उडता येणार नाही, कावळा बगळ्या सारखा शुभ्र होणार नाही, मयूर कितीही सुंदर असला तरी त्याच्या गळ्यात कोकिळ पक्ष्याचा पंचम कुठून येणार? थोडक्यात अपेक्षाभंगाच्या खांबावर आदळण्यापूर्वी आपण आपल्या गतीवर, वेगावर संयम मिळवण्याचा निदान प्रयत्न तरी करावा. स्पर्धेत उतरण्यापूर्वीच कुणाशी तुलना करण्यापेक्षा आपणच आपल्याशी तुलना केली तर अपेक्षाभंग हा शब्द आपल्या वाटेत फारसे अडथळे निर्माण करू शकणार नाही. हे माझे एक छोटेसे, व्यावहारिक पेलवता येणारं तत्त्व!
बघा पटतं का?
**राधिका भांडारकर*
