*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी-कनयाळ भागांतील बोगस स्थलांतरित मतदारांची नावे हटवावी मनसेची जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे मागणी.*
*सतर्क नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करून सुद्धा प्रशासन ढिम्मच मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा आरोप.*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायनिंग, चिरे-खडी, वाळू व्यवसाय त्याचप्रमाणे आंबा बागायतदार व मासेमारी व्यवसायासाठी मजूर म्हणून परप्रांतीय मोठ्या प्रमाणात येत असतात. यातील काहीजणांची बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय योजना लाटण्याच्या उद्देशाने अथवा राजकीय लाभ मिळवण्यासाठी या परप्रांतीय मजुरांची नावे मतदार यादीत घालण्याचे प्रकार झालेले आहेत. यातूनच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ला तालुक्यामधील रेडी-कनयाळ मधील यादी क्र.92, वार्ड क्र.5 मध्ये गेल्या वीस वर्षापासून वास्तव्यास नसलेले कायमस्वरूपी विस्थापित नागरिक येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करत आहेत. याबाबत वेळोवेळी त्या ठिकाणच्या सतर्क नागरिकांनी तक्रार करून देखील संबंधित बीएलओ यांनी अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. आणि म्हणूनच मनसेकडे तक्रार प्राप्त होतात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेत या संदर्भात कडक कारवाई करण्यासंबंधी तक्रारीचे निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, माजी तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुका अध्यक्ष गजानन राऊळ, विभाग अध्यक्ष अविनाश अणावकर, शाखाध्यक्ष हेदुळ सुरज पुजारे,विजय जांभळे, भालचंद्र आकलेकर,आप्पा सावंत शाखाध्यक्ष पिंगुळी,तनिष ठाकूर आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
