सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देण्याची आदर्श परंपरा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कायम ठेवली आहे. वैद्यकीय क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उल्लेखनीय काम केलेले डॉ. राजेशकुमार प्रकाशचंद गुप्ता यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. यासह अन्य पाच जणांना जिल्हा बँकेचे पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा करण्यात आली असून पुरस्कारांचे वितरण रविवार दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता येथील शरद कृषी भवन येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सिंधुदुर्नगगरी येथील पत्रकार परिषदेत केली.
जिल्हा बँकेच्या पुरस्कार निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली होती. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते. यावी बँकेचे संचालक आत्माराम ओटवनेकर, आर टी मर्गज आदी उपस्थित होते. सन २०१६ पासून जिल्ह्यात सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा जिल्हा बँकेमार्फत गौरव करण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती. या वर्षी बँकेचे पुरस्कारात स्वर्गीय बाळासाहेब सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सावंतवाडी येथील डॉ राजेशकुमार प्रकाशचंद गुप्ता यांना, कै शिवरामभाऊ जाधव स्मृती प्रित्यथ् उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार कुडाळ तालुका सहकारी विक्री संघ लि. कुडाळ यांना, कै केशव रावजी राणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग चे संस्थापक पिटर फ्रान्सिस डांटस यानां, कै डी बी ढोलम स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी कर्मचारी पुरस्कार जयदीप सुरेश पाटील, एम डी डॉ डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना मर्यादित गगनबावडा यांना, तर कै भाईसाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा कृषीमित्र पुरस्कार देवगड दहिबाव येथील श्रीधर पुरुषोत्तम ओगले यांना जाहीर झाले आहेत. पुरस्कार देण्याचे हे सलग सहावे वर्ष असून या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येथील शरद कृषी भवन येथे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितीत संपन्न होणार आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा शाल, श्रीफल, सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.