You are currently viewing मला कवीचा चष्मा लागला

मला कवीचा चष्मा लागला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांनी कवी अरुण वि देशपांडे यांच्या काव्यसंग्रहाचे केलेलं परीक्षण*

 

काव्यसंग्रह – *मला कवीचा चष्मा लागला*

कवी – *श्री. अरुण वि.देशपांडे*

प्रकाशन- *संवेदना*

किंमत- रु.१५०/-

 

ज्येष्ठ लेखक कवी श्री. अरुण वि. देशपांडे यांचा ‘मला कवीचा चष्मा लागला’ हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. कवी, लेखक, बालसाहित्यिक, समीक्षक असे साहित्याच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. देशपांडे यांचा ७७ पुस्तकांचा प्रदीर्घ मोठा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे कवीची लेखणी सशक्त समृद्ध बनलेली आहे. हे कवीचे ७८ वे पुस्तक म्हणजे कवीचा ३२ वा. कवितासंग्रह आहे. या पुस्तकांमध्ये ३ कवितासंग्रह पुस्तक स्वरूपात, अनेक बालकवितासंग्रह, ई बुक स्वरूपातले कवितासंग्रह, प्रिंट बुक स्वरूपातील २ हिंदी कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठीसह हिंदी भाषेतही त्यांनी काव्य लेखन केलेले आहे. तसेच त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज यांच्यावरही अनेक रचना लिहिलेल्या आहेत.

या कवितासंग्रहाच्या वेगळ्या शीर्षकाने मन आकर्षून घेतले‌. सर्वसाधारणपणे चष्मा लागणे हे प्रौढत्वाचे लक्षण आहे. काही अपवाद असू शकतात. पण रूढार्थाने चष्मा लागणारी व्यक्ती ही वैचारिक परिपक्वता येऊन अनुभवसिद्ध असते. तशीच इथे कवीची स्थिती आहे.

आपल्या या दीर्घकालीन काव्य लेखनाबद्दल कवी आपल्या मनोगतात खूप छान व्यक्त होतात. कवी म्हणतात,” सतत कवितांच्या संपर्कात येण्याने, लिहिण्या, वाचण्याने माझी कवीची नजर अधिक सूक्ष्म, सजग होत आहे असे वाटू लागले आहे.” आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या ‘दर्शनी’ आणि ‘अंतरंग’ अशा दोन्ही स्वरूपात फार फेरफार झाले आहेत. तसेच कवी- वृत्तीत वाढ झाली आहे असे कवी पुढे म्हणतात. कवी मनाची अस्वस्थता, घालमेल, स्वप्नाळू वृत्ती, व्यक्त होण्याची असोशी हे सर्व कविगुण आपल्यात झिरपत गेल्याचेही कवी सांगतात.

या गोष्टींचा या संग्रहातील कविता वाचताना सतत अनुभव येतो. अतिशय साध्या, सोप्या, सुलभ भाषेत सर्व कविता लिहिलेल्या आहेत. ४ ते ५ कडव्यांच्या या आटोपशीर कविता आहेत.

या सर्व कविता अक्षरवृत्त, अभंग, ओवी, मुक्तछंद स्वरूपातील आहेत. उपमा, अलंकाराची कारागिरी नाही. छंदोबद्ध, वृत्तबद्ध कविता, गझल लेखन अशा तंत्रशुद्ध कविता लेखनासाठी लागणारा अभ्यास, लेखन तंत्रशुद्धता याचा आपल्यापाशी अभाव आहे याची कवी मनोगतात प्रांजळ कबुली देतात. त्यामुळे त्यांची कविता सुबोध आणि वाचकप्रिय झालेली आहे.

त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनातल्या विविध अंगांना स्पर्श केलेला आहे. निसर्ग, पाऊस, आपला गाव ,नाती, आई, कुटुंब, आठवणी, संस्कृती, मैत्री, कवी, कविता, ध्येय, स्वप्नं अशा आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असंख्य गोष्टींवरील या एकूण ८३ रचना यात समाविष्ट आहेत.

कवीचा चष्मा लावून आजूबाजूच्या विश्वाचा वेध घेणारा कवी आपल्या शब्दात त्या त्या भावना व्यक्त करतो, कारण

 

शब्द वश या वेड्याला

वेदनेची कविता लिहायला !

 

कवी असतो

भावनांचा दूत

म्हणूनच तो तुमच्या आमच्या भावना त्याच्या कवितेतून व्यक्त करतो. कारण संवेदनशील मनात भावना दाटल्या की त्या व्यक्त झाल्यावरच मनाला स्थिरता येते.

 

अस्वस्थ मनास स्थिरता

देऊ शकते ती कविता

भावनांचे प्रतिबिंब असते

सहज सुंदर ती कविता….

 

प्रत्येक आई बाईच असते आणि प्रत्येक बाईत आई असते. तिच्याविषयी आदरयुक्त शब्दात कवी लिहतो,

 

घराची अब्रू बाई

दुःख लपवे आई,

घराचे सुख बाई

घराचे घरपण आहे !

 

मोह, आकर्षण, लालसा, बेगडी वैभव अशा विविध गोष्टींनी आयुष्य आपल्याला गुंतवून ठेवते आणि त्या गुंत्यात आपण फिरत राहतो.

 

आयुष्य नावाच्या कोळ्याने

विणून ठेवलंय जगणे नावाचे

सुंदर मोहक फसवेसे जाळे

घेते खेचूनी भक्ष्यास हे जाळे ….

 

आयुष्याचे अगदी सोप्या शब्दात वास्तव दर्शविले आहे. आपल्याला आपली ओंजळ कायम सुखाने, आनंदाने भरलेली आहे असेच वाटत असते. पण ही गळकी ओंजळ कधी रिकामी होते हे समजत नाही. हे पण आयुष्यातले एक वास्तव आहे.

 

गळक्या ओंजळीचे हात आपले

त्यात कधीही काहीच ना मावले |

जे जे मनाला कधी कधी भावले

नशिबास मात्र कधी ना भावले ||

 

आपली नाती, आपले वागणे, स्वभाव, इच्छा- अपेक्षा, बदलत्या काळातली मनोभूमिका, मनाचे वागणे, मित्रांशी व्यवहार अशा जगण्यातल्या मूलभूत गोष्टी, दुनियादारी, निसर्ग अशा विविध गोष्टींवर कवीने छान भाष्य केले आहे. काही काही कविता खूप छान आहेत.

उदा:- ‘डागडुजी इमारतीची’– आपल्या शरीराला एका इमारतीचे रूपक मानून तिची देखभाल कशी करावी हे छान मांडले आहे.

‘मनात असले तरी’– या कवितेत इतरांशी कसे वागावे हे छान समजावले आहे.

 

मला कवीचा चष्मा लागला

नवाच नंबर बदलून आला,

दृष्टिदोषात सुधारणा झाली

माझ्या नजरेत फरक पडला….

 

कवीचा चष्मा लागल्याने आपल्या विचारसरणीत कसा बदल झाला याचे हे आत्मपरीक्षण आहे. आपल्या मातृभाषेचा योग्य सन्मान सगळ्यांनी करायला हवा. त्रिभुवनात गौरव झाला असला तरी घरात तिला मानाचे स्थान द्यावे हे सांगताना कवी म्हणतो

 

हे मराठी माणसा, ऐक ना

व्यवहारी भाषा योग्य जरी

घरात वावरावी मराठी खरी

तिला तू विसरू नकोस ना….

 

शेवटची ‘ध्येय’ कविता बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचे आवाहन करते.

 

उजाडलीय पहा पहाट नवी

चला, मोहिमेवर निघायला हवं,

ठरवलंय जे ध्येय मनाशी

ते साध्य करायलाच हवं….

 

श्री. अरुण देशपांडे यांच्या या कविता विविधांगी विषयातून जीवनस्पर्शी झाल्या आहेत. त्या वाचताना या सगळ्या आपल्याच कविता वाटू लागतात. कारण त्यांनी आपल्याही आयुष्यातील विविध भावना त्यात

व्यक्त केल्या आहेत. त्यातून जगताना वास्तवाचे भान ठेवून कसे जगावे याचे नकळत मार्गदर्शनही केले आहे.

यामधून कवीचे प्रगल्भ विचार आणि अनुभवविश्व जाणवते. सहज सोप्या शब्दात विचार मांडण्याची त्यांची हातोटी सुंदर आहे‌. यापुढेही कवी कडून अशाच सुंदर कविता रसिकांना वाचायला मिळाव्यात ही अपेक्षा. त्यासाठी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा !

 

*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा