महागाईला प्रोत्साहन देण्याचा मोदी सरकारने जणू चंगच बांधल्यासारखे दिसून येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढीनंतर सामान्य जनता आक्रोश करत असतानाही विमान व नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी देशांतर्गत विमानप्रवासाच्या दरातही १० ते ३० टक्के वाढ केली आहे.
नव्या आदेशानूसार ४० मिनिटांपेक्षा कमी काळ प्रवासासाठी कमीत कमी २,२०० ते जास्तीत जास्त ७,८०० रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी हा दर अनुक्रमे २,००० व ६,००० रुपये असा होता. याचप्रमाणे ४०ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी अनुक्रमे २,८०० व ९,८०० रुपये द्यावे लागतील, यापुर्वी ते २,५०० ते ७,५०० रुपये असे होते.
जसजसा विमानप्रवासाचा कालावधी वाढत जाईल तसतसा प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत जाणार आहे. ही वाढ ३१ मार्चपर्यंत लागू असणार असून त्यानंतर त्यात पुन्हा बदल केला जाणार आहे. तसेच विमानांना त्यांच्या आसनक्षमतेच्या ८० टक्के क्षमतेएवढेच प्रवासी वाहतुक करता येणार आहे.