मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इतर पक्षांच्या नेत्यांची इनकमिंग सुरू आहे. गुरुवारी नाशकातील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाºयांनी मनसेचा झेंडा हाती धरला. नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठी तयारी सुरू केली आहे. बुधवारी ठाणे आणि वसई-विरारमधील शेकडो भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्येसुद्धा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.
नाशिकमधील शिक्षकांच्या एका समुदायाने मनसेत प्रवेश केला. आधी हे शिक्षक भाजपासाठी कार्यरत होते. तसेच, येवल्याच्या मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारीही गुरुवारी मनसेत दाखल झाले. दरम्यान, आगामी काळात नाशिक महानगरपालिकेत जास्तीत जास्त मनसेचे नगरसेवक निवडून आणू आणि राज ठाकरे यांचा नाशिकमध्ये झंझावात सुरू होईल,अशी प्रतिक्रिया अशोक मुर्तडक यांनी यावेळी दिली.
शिक्षकांच्या एका समुदायाचा मनसेत प्रवेश