भोसरी, पुणे :
श्रीराम विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय, भोसरी येथील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने व शिक्षण मित्रपरिवार भोसरी यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगीगव्हाण (ता. परंडा), व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडनेर (ता. परंडा) येथील एकूण १४० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, प्रत्येकी एक डझन वह्या व कंपास बॉक्स देण्यात आले. तसेच माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेळगाव (ता. परंडा) येथील विद्यार्थ्यांसाठी ३० बेंच देण्यात आले.
याशिवाय, शिक्षणात प्रगतीस प्रोत्साहन म्हणून शेळगाव शाळेतील यंदाच्या इयत्ता दहावीच्या पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पाच हजार रुपयांचे बक्षीस माजी विद्यार्थी संघाचे प्रेरणास्थान कै. खंडू ढमाले सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जाहीर करण्यात आले.
हा उपक्रम समाजातील शैक्षणिक जाण वाढवणारा, तरुण पिढीला प्रेरणा देणारा आणि माजी विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ करणारा ठरला.
या प्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य शुभांगी साने मॅडम, नम्रता शेटे, सचिन कोळेकर, स्वप्निल होरे, पृथ्वीराज शिंदे, तसेच श्रीराम विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री. जगदाळे सर, विभाग प्रमुख सौ. भोसले सुनिता मॅडम, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता हुंबे मॅडम, विभाग प्रमुख सौ. शिंदे सीमा मॅडम, सकल मराठा संघाचे श्री. वैभव ढोकले, दीपक दैन सर तसेच वरील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाबद्दल माजी विद्यार्थी संघाचा सदस्य पृथ्वीराज शिंदे यांनी सांगितले की, “आपल्या शाळेने आपल्याला घडवलं, आता आपण समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. शिक्षणासाठी एकजूट हा आमचा हेतू आहे.”
“आपण ज्या शाळेतून घडतो, त्या शाळेच्या नावाने समाजातील गरजू विद्यार्थ्यांना हातभार लावणे ही आमच्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षण हेच खरे साधन आहे – आणि शिक्षणासाठी एकजुटीचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”
शाळेचे मुख्याध्यापक श्री जगदाळे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की हा उपक्रम शैक्षणिक संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे.
व समाजातील शैक्षणिक जाण वाढवणारा, तरुण पिढीला प्रेरणा देणारा आणि माजी विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ करणारा आहे.
