*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*बना, मनाचे शिल्पकार..*
होय, आपणच आपल्या मनाचे शिल्पकार बनायचे असते, म्हणजे मनाला घडवायचे असते..
तरच तुम्हाला भवितव्य असते..कारण मनानेच तर
इतर सारे व्यापार चालतात ना? प्रत्येक कृती मनातूनच निर्माण होते, मनच सारे काही ठरवते.
एवढेच काय शारीरिक दुखणी सुद्धा मन दुखावल्यावरच सुरू होतात.म्हणजे, उदा. देऊन
सांगते,पोटदुखी व लुज मोशन ची तक्रार घेऊन
पोटाच्या विकाराच्या डॅा.कडे मी माझ्या एका मैत्रिणीला घेऊन गेले असता, ते सरळ म्हणाले,”
घरात काही टेन्शन आहे का?” मी तर थक्कच
झाले ऐकून. पोटाच्या विकाराचा थेट मनाशी संबंध? बाप रे .. कारण तो पर्यंत असे काही असते हे मला माहितच नव्हते.असे असेल तर
आपण मनाची किती काळजी घेतली पाहिजे हो!
कष्ट करण्याची तयारी..
मन घडवण्यासाठी मुख्य गरज आहे ती ज्ञानाची.
व त्यासाठी लागतात कष्ट, वाचण्याचे हो…!
आणि शतकानुशतके त्याचा सोर्स फक्त नि फक्त पुस्तके आहेत. जगातला कोणताही महान
माणूस निवडा व त्याची साक्ष काढा. तो सांगेल, मी पुस्तकांमुळेच घडलो. सतत चांगल्या पुस्तकांच्या वाचनानेच मनावर, आपल्याही नकळत संस्कार होतच असतात. मेंदूत ते ज्ञान
कायमस्वरूपी साठवले जातेच. मेंदू ते कधीच
विसरत नाही. योग्य वेळी योग्य त्या गोष्टी आठवतातच. अगदी सोनार दागिना घडवतो तसे
पुस्तके आपल्याला निगुतीने घडवत असतात.
ह्या चांगल्या संस्कारांचाच परिपाक असतो की,
पुस्तकातली चेटकीणही आपल्याला आवडत नाही, एवढेही उदा. मला वाटते पुरेसे आहे. सिनेमातले व्हिलन आवडत नाहीत, कारण ते वागणे चूक आहे असा संस्कार पुस्तकांनी आपल्यावर केलेला असतो, हो की नाही?…
म्हणून मी म्हणाले, या साठी लागणारा महत्वाचा गुण असतो कष्ट
करण्याची तयारी.” दे रे हरि, खाटल्यावरी”
असे कधीच होत नसते. कोणतेही फळ पाहिजे
असेल तर धडपड करावीच लागते त्या शिवाय
ते पदरात पडतच नाही. झाडाखाली उभे राहून मान वर करून तुम्ही म्हणालात, “पड रे फळा तोंडात!” कसे शक्य आहे. ते रसरसलेले फळ पाहिजे असेल तर झाडावर चढायचा किंवा अन्य
प्रकारे जमेल तसा प्रयत्न करायलाच हवा. त्या
शिवाय ते हाती लागणार कसे?
त्या प्रमाणे पुस्तके मिळवली पाहिजेत व वाचली
पाहिजेत, एवढे तरी कष्ट करायलाच हवेत ना?
पैसा हाती आल्या आल्या बाबासाहेब निम्मे पैशांची पुस्तके घेऊन टाकत त्यामुळे घरात अन्नाची प्रचंड चणचण असे व रमाबाईंची प्रचंड
कसरत होत असे पण बाबासाहेबांना त्याचा पत्ताही नसे.ते म्हणत, “ मी पुस्तकांशिवाय जगूच
शकत नाही”.
माझा स्वत:चा अनुभव…
आज मी जी काही आहे ती केवळ पुस्तकांमुळेच
आहे. आणि त्या साठी मी खरोखर मेहनत केली आहे म्हणाल तरी चालेल. पुन्हा सांगते, मनाचा
शिल्पकार पुस्तकेच आहेत. दुसरे कुणी ही नाही.
मग तुम्ही म्हणाल, घरातल्या संस्कारांचे काय?
अहो, घरात रामरक्षा ज्ञानेश्वरी तुकोबांचे संस्कार
होतात ते कुठून येतात? पुस्तकातूनच ना? त्या ग्रंथांचे वाचन करूनच आपले पालक घडले व
आपल्याला घडवतात, म्हणजे त्यांच्या आचरणाचा संस्कार आमच्यावर अनुकरणाने
होत असतो. म्हणजे शेवटी पुस्तकेच. मी पी डी नि
एफ वाय दोन वर्षे काय वाचले नाही? आणि आज वयाच्या ह्या टप्प्यावरही वाचतेच आहे मंडळी. फडके खांडेकर काळातील एक ही लेखक मी वाचायचा सोडला नाहीच पण रणजित
देसाई, शिवाजी सावंत पूर्ण वाचून नव्या पॅपिलॅान
पर्यंत सारेच वाचले. मी तर म्हणते, नुसते अत्रे वाचले तरी पुरे, इतके ते महान आहेत. यादी दिली
तर फारच मोठी होईल इतके मी वाचले आहे.
त्याचाच परिपाक आज माझ्याहातून ३३ पुस्तके
लिहून झालीच पण मी आजही अखंडपणे लिहिते
आहे, लिहू शकते हे तुम्ही बघता आहातच ना?मला कधीही शब्दांची चणचण भासत नाही. शब्द
जणू हात जोडून माझ्या समोर उभेच असतात व
मी केव्हा लिहायला सुरूवात करेन याची वाट
बघतात व मी हाती लेखणी घेताच माझ्यामागे
पळत सुटतात जणू. माझं प्रत्येक लेखन लिहिलं नि बाजूला ठेवलं असं असतं. काडीचाही बदल किंवा संस्कार मी त्यावर करत नाही इतकी मला
त्याची खात्री असते.
माझ्या वडिलांनी त्या काळात शिकण्याची संधी
दिली नि पुस्तकांनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं.
आई, वडील, समाज,शिक्षक यांनी घडवलेच पण
मला पुस्तकांनी घडवले. आजचे माझे संस्कारक्षम मन पुस्तकांमुळे घडले व मन चांगले घडल्यामुळे पुढे आपोआप सारे छान घडले. कारण कोणत्या प्रसंगाला कसे तोंड द्यायचे हे
मला पुस्तकांनीच शिकवले ना? रामायण महाभारत या महान ग्रंथांनीच मला जीवनाची
लढाई कशी लढायची हे शिकवले. म्हणजे माझ्या मनाची शिल्पकार मीच असले तरी त्यात
पुस्तकांचाच वाटा जास्त आहे.रामायण महाभारतात काय नाही? जीवनाचे सारेच तत्वज्ञान त्यात आहे. म्हणून आज इतक्या वर्षांनंतरही रामायण महाभारताची पारायणे व
कथायज्ञ ठिकठिकाणी चालू असतात व लाखोंच्या संखेत तिथे श्रोते असतात व ते मनोभावे ऐकतात. या ग्रंथांचा आजही समाजावर
वचक आहे व श्रद्धा ही आहे. हे ग्रंथ मनाचे शिक्षक व समाजाचे तारणहार आहेत. नीती अनितीचे सारे धडे त्यात मिळतात.मनाच्या घडणी
साठी पुस्तकेच हवीत, फक्त पुस्तकेच!… ती वाचली की मनाचे शिल्प घडलेच म्हणून समजा.
हे पुस्तकांचे संस्कार ज्यांच्यावर घडत नाहीत
त्या व्यक्ती वाम मार्गाला लागलेल्या आपण पाहतो. अर्थात, पुस्तके वाचून कोणी चोऱ्या करत
नाही, असे ही होत नाही. प्रत्येक ठिकाणी अपवाद हा असतोच ना? शेवटी “ बहुरत्ना वसुंधरा”.. दुसरे काय?..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
