चौके ग्रामदेवता भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव 11 नोव्हेंबर रोजी
मालवण
चौके गावची स्वयंभू नवसाला पावणारी ग्रामदेवता श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण सप्तमी शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे.
या निमित्ताने मंदिरात रोजच्या प्रमाणे सकाळी भराडी देवी व इतर देवतांची पूजा अर्चा केली जाते. त्यानंतर सकाळी दहा वाजता सर्व मानकरी गावकरी मंदिरात जमा होतात.मानाची पहिली ओटी पालटदार कुटुंबाकडून भरली जाते.
त्यानंतर इतर ओट्या भरल्या जातात. हा ओट्या भरण्याचा कार्यक्रम दिवसभर रात्री उशिरापर्यंत चालू असतो. यानंतर रात्रौ देवीला धूप ओवाळून देवीची महाआरती करून मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होते.यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यानंतर रात्री उशिरा चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा पारंपारिक नाट्य प्रयोग सादर केला जातो. तरी भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी तसेच देवस्थान समिती यांच्याकडून करण्यात आले आहे.

