*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा मानसी मोहन जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुळशीचं लग्न*
निसर्गातली अल्लड तुळशी
कृष्ण सख्याच्या भरे मनी
ऊस जोंधळा मंडप सजला
शोधत येतो कृष्ण वनी
चिंच आवळा नवीन ऋतुचे
हुरडा प्रसाद वाटू या
लग्न लागले कृष्ण प्रियाचे
चला फटाके उडवू या
देवघराचा कृष्ण लंगडा
नवरा झाला तुळशीचा
नटूनथटुनी वाजतगाजत
डौल वाढवत मंडपाचा
श्रीकृष्णाने सार्थक केले
बंधन प्रेमी युगुलाचे
युगायुगाचे वचन पाळले
राधा माधव प्रेमाचे
श्रीकृष्णाची अथांग भक्ती
तुळशीरूपे झुलते गं
प्राणवायु अन्,औषध होते
दारी माझ्या हसते गं
मुखात देता इथे शवाच्या
आत्म्यासाठी मुक्ती गं
ह्रदयामध्ये श्रीकृष्णाने
कृष्ण प्रियेला जपले गं
प्रा.मानसी जोशी
ठाणे
