You are currently viewing शतप्रतिशत भाजपा आणण्यासाठी स्वबळाचा नारा

शतप्रतिशत भाजपा आणण्यासाठी स्वबळाचा नारा

संपादकीय…..

*शतप्रतिशत भाजपा आणण्यासाठी स्वबळाचा नारा*

*सावंतवाडीत उजळले जनसंपर्काचे नवे केंद्र; *विशाल परब यांचे नेतृत्व अधोरेखित*

भाजपचे युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज झाले. हे केवळ विशाल परब यांचेच कार्यालय नसून जिल्हा भाजपचे केंद्रस्थान आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आणि तसे सूतोवाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. त्यामुळे भाजपाचे जिल्ह्याचे राजकारण आता विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयातून होणार हे निश्चित..! त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कारण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी असो की, युवा नेते विशाल परब सर्वांनीच आपण लोकसभा, विधानसभा महायुती करून लढलो आणि जिंकलो पण, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ती स्वबळावर लढूया असा सूर आळवला होता त्यावर रवींद्र चव्हाण काय बोलतात याची उत्सुकता लागून राहिली होती.
खासदार नारायण राणे शिवसेना, काँग्रेस पक्षात असताना जिल्ह्यातील निवडणूक त्यांच्या आदेशावर त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जात होत्या. राणेंचा निवडणुकीत वरचष्मा असायचा, ते सांगतील त्याला उमेदवारी..! परंतु, जिल्ह्यातील परिस्थिती बदलली आणि आता प्रदेशाध्यक्ष झाले म्हणून नव्हेत तर त्यापूर्वीपासून जिल्हा भाजपच्या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाण यांचा बोलबाला असतो हे ही तितकेच खरे..! आजच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी एकंदर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्याने असेल किंवा अन्य काही कारणांनी जास्त बोलणे टाळले आणि “ही कार्यकर्त्यांची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने लढणार आहे. आतापर्यंतच्या भाषणाला माझं ‘मम्’ आहे. कमळ चिन्हाचा उमेदवार आपला असणार आहे‌. खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा भाजपमय झाला, राहिलाय, तो यापुढेही राहील असा विश्वास व्यक्त करत राणेंना श्रेय किंवा मोठेपणा देण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून जिल्हा भाजपामध्ये एकी टिकून रहावी, कोणत्याही परिस्थितीत फूट पडू नये आणि राणेंचे कार्यकर्ते तनमनाने पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी रहावेत यासाठी मोजक्याच शब्दात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

*ज्याला मी नगराध्यक्ष केला तोच माझ्या विरोधात आव्हानाची भाषा बोलतो*
आम्ही कुणाची जिरवण्यासाठी जमलो नसून विशाल परब यांनी उभं केलेल्या भव्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित आहोत. येणारे दोन महिने जिद्दीने काम करावं लागेल. आपली रेष मोठी करण्याच काम करायचं आहे. दुसऱ्याची रेष पुसायचे काम करायचे नाही. भाजपची ताकद असल्याने स्वबळासाठी कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यात काहीही चूक नाही. असं म्हणत त्यांनी मनात असलेलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर लढायचं जाहीर करून टाकलं.
भाजपच्या ताकदीशिवाय कोणीही आमदार होऊ शकला नाही. आम्ही कोणाला डिवचल नाही. वातावरण खराब केलं नाही. ज्यांना मी नगराध्यक्ष केलं ते आता मला आव्हान देऊ लागलेत. विधानसभेला प्यार किया तो डरना क्या, आता हम आपके है कोन ? अशी परिस्थिती झालीय असा टोला त्यांनी संजू परब यांचे नाव न घेता हाणला. अरे ला कारे करण्यात आमची पीएचडी आहे‌. अंगावर केसेस आहेत, आताच ३०७ मधून दोषमुक्तता मिळाली. आम्हाला जनतेसाठी काम करायचं आहे. कोणाची जिरवायची यासाठी काम करायचं नाही. सिंधुदुर्गात उबाठा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडे उमेदवार शिल्लक नाहीत. आमची युती झाली तर कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. बंडखोरी रोखण्यासाठी आमचा प्रयत्न आहे‌. विरोधकांना लायकीत ठेवायचं असून त्यांना रेडिमेड उमेदवार द्यायचे नाहीत. आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढवून नंतर एकच येणार आहोत. आमचे नेते एकत्र आणणारच आहेत. लोकसभा, विधानसभेची परिस्थिती वेगळी होती. युती करून बंडखोरी झाली तर परवडणार नाही. भाजपला थांबवण्यासाठी आपसात वाद लावण्याच काम होत आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष न देता कमळ चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा, त्यासाठी काम करा‌. सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी काम करत असलेल्या विशाल परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. जन सुविधा केंद्राचा लाभ लोकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला‌. तसेच पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गला नंबर वन करण्यात आपण पुढे आहोत. जिल्ह्यातील दोन नंबर धंदे बंद झाले आहेत‌. हे होत असताना असंख्य माता भगिनी आम्हाला आशीर्वाद देखील देत आहेत. कोणाला प्रवेश आवडेल कोणाला नाही आवडणार आहे. मात्र, पक्ष वाढत असल्यास ती स्वीकारली पाहिजे असे आवाहन करत प्रदेशाध्यक्षांची कॉलर टाईट करण्याची जबाबदारी आपली आहे. १०० टक्के निकाल लावून आपल्याला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे. शतप्रतिशत भाजप जिल्ह्यात करून दाखवा असे आवाहन त्यांनी केलं.

*३ डिसेंबरला महाराष्ट्रात भाजपचं कमळ दिसेल*

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा प्रदेशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. भाजप विश्वातील सर्वात मोठी पार्टी आहे. जनसेवेसाठी कार्यालय सुरू करून सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना दिला जाणार आहे. ३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच कमळ दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत चारही नगरपरिषदेत भाजपला यश मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

*पक्षप्रवेश एक शिरस्ता*
मायकल डिसोजा, विक्रांत सावंत, रुपेश पावसकर मुख्य प्रवेशकर्ते….

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेण्यात आले. यामध्ये उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, कुडाळ शिवसेनेचे रुपेश पावसकर, मालवणचे शुभम मठकर तसेच रोणापाल, नेमळे, माडखोल येथील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. परंतु तीन महनीय नेते, एक भाजपची बुलंद तोफ, दुसरे राज्याचे नेतृत्व खांद्यावर वाहणारे प्रबळ नेते तर तिसरे राज्याच्या विधानसभा सभागृहाला चालविणारे धुरंदर नेते जिल्ह्यात एकत्र आले असताना जिल्ह्याचे मुख्य कार्यालय म्हटले जाणाऱ्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणावे तेवढे मोठे पक्षप्रवेश झालेले दिसले नाहीत. हे एवढ्यासाठीच म्हणावे लागले कारण रोजच कुणी ना कुणी शिंदे गटातून भाजपात तर कुणी भाजपा मधून शिंदेगट असा प्रवास सुरूच असतो. त्यामानाने आजचे पक्षप्रवेश हे किरकोळ असल्याचेच म्हटले जाते.
दुसरीकडे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष असलेले बबन उर्फ प्रेमानंद साळगावकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करून सावंतवाडी शहर भाजपाला स्वच्छ चारित्र्याचा माणूस दिला. जास्त गाजावाजा न होता झालेला हा पक्षप्रवेश भाजपाच्या पथ्यावर किती पडणार हे पाहणे आवश्यक आहे. कारण मागच्यावेळी झालेल्या नगराध्यक्षांच्या पोटनिवडणुकीत थेट निवडणूक होऊन बबन साळगावकर यांनी केसरकरांची साथ सोडल्यावर त्यांना अल्प मतांवर समाधान मानावे लागले होते हे देखील विसरून चालणार नाही.

एकंदर आजचा कार्यक्रम सिंधुदुर्ग भाजपला नवं संजीवनी देणारा होताच परंतु त्यापेक्षा हौश्यागौश्यांना उमेदवारीची एक नवी पालवी फोडणारा होता हे मात्र नक्कीच खरे..!

प्रतिक्रिया व्यक्त करा