जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली उमेदवारीची घोषणा; चार नगरसेवक पदांसाठी उमेदवार निश्चित
वेंगुर्ले :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच काँग्रेसने वेंगुर्ले नगरपरिषदेसाठी रणधुमाळी सुरू केली आहे. आज साई मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी नगराध्यक्ष पदासाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
प्रदेश काँग्रेसकडून हिरवा कंदील मिळाल्याची माहिती देताना शेख यांनी अजून चार नगरसेवक पदांसाठी उमेदवार जाहीर केले. प्रभाग २ ब मधून माजी नगरसेवक विधाता सावंत, प्रभाग ५ ब मधून चेतन कुबल, प्रभाग ६ ब मधून महेश (प्रकाश) डिचोलकर आणि प्रभाग ८ ब मधून सतेज मयेकर अशी नावे जाहीर करण्यात आली.
“वेंगुर्ले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. मैत्रीपूर्ण लढतीसाठी मित्र पक्षांसोबत चर्चेला आमची तयारी आहे,” असे शेख यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला विलास गावडे, विधाता सावंत, आत्माराम (दादा) सोकटे, सतेज मयेकर, चेतन कुबल यांसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. शेख यांनी पुढील टप्प्यात उर्वरित उमेदवारांची घोषणा केली जाईल, असेही स्पष्ट केले.

