You are currently viewing मायकल डिसोजा यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित

मायकल डिसोजा यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित

मायकल डिसोजा यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा

सावंतवाडी

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांचा भाजप प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. उद्या (५ नोव्हेंबर) संध्याकाळी चार वाजता ते आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मायकल डिसोजा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. मात्र काही कारणास्तव हा प्रवेश सोहळा पुढे ढकलला गेला होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय निश्चित केल्याची माहिती स्वतः डिसोजा यांनी दिली.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून सावंतवाडीतील विशाल परब यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून मायकल डिसोजा यांचा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

या प्रवेशामुळे सावंतवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा