✒️ निखिल कोलते, मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबई
संवाद दिवाळी अंक खरोखरच वाचकांसाठी एक मेजवानी आहे. विविध लेखकांच्या कविता, कथा, लेख त्याचबरोबर खाद्य संस्कृतीला अनुसरून असलेले विविध अंगी साहित्य याने हा अंक अधिकच रोचक झाला. जाहिराती असून देखील मोजक्याच असल्याने तो रटाळ न वाटता रंगतदार झाला. अंक काढायचा म्हणजे साधी गोष्ट नाही त्यासाठी खूपच मेहनत लागते आणि ती तुमची आणि तुमच्या टीमची मेहनत या अंकामार्फत दिसून येते आहे.
आता आमच्या साहित्य बद्दल बोलायचे झाले तर आमच्या साहित्याला यात एक विशेष मानाचे एक पान मिळाले हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. त्यात आपण आमची कथा या अंकाकरिता घेतली त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन. माझे तर घेतलेच परंतु माझ्या लाडक्या बहिणीचे, मानसी ताई पंडित हिचे साहित्य देखील आपण या अंकात समाविष्ट करून घेतले आहे. अर्थात ते योग्यच असेल म्हणून छापले गेले यात शंका नाही. मात्र तरीही माझ्यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणीचे साहित्य या अंकात प्रकाशित झाले आहे याचा मला अतिव आनंद होतो आहे. साहित्य क्षेत्रात नवी झेप घेऊ पाहणाऱ्या तिच्या साहित्यिक वाटचालीसाठी तिच्या साहित्यिक मनासाठी नक्कीच प्रोत्साहित करणारी ही बाब आहे. तिचे साहित्य या अंकात प्रकाशित झाल्यामुळे तिच्या मनाला नवी उभारी मिळाली असेल, लेखनाविषयी रोचकता आणि जिज्ञासा निर्माण झाली असेलच यात शंका नाही. जेव्हा आपले लेखन एखाद्या पुस्तकामार्फत किंवा विशेषांकामार्फत समाजासमोर येते तेव्हा ते पडद्याआड न राहता समाजमान्य होते आणि म्हणूनच याचा आनंद शब्दातीत आहे. कारण, ताईचे लेखन आपल्या अंकाच्या माध्यमातून तळागळाला पोहोचेल आणि वाचले जाईल. जे कौशल्य केवळ आम्हाला ठाऊक होते ते तिचे कौशल्य आता जास्तीत जास्त लोक अनुभवतील आणि हे फक्त आपल्यामुळे शक्य झाले. किंबहुना अर्थातच तिचे हे साहित्य दर्जेदार असल्यामुळे ते आपण आपल्या अंकात छापून घेतल्यामुळे शक्य झाले.
वर्षानुवर्षे आपला हा दिवाळी अंक सातत्यपूर्ण यशाची शिखरे गाठत राहो आणि आम्हाला आमचे साहित्य या अंकाकरिता लिहिण्याची संधी मिळत राहो आणि आपल्या या अंकाद्वारे आमचे साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो.
