जीवनात प्रगती करायची असेल तर आपल्याला योग्य वेळ साधता आली पाहिजे. दिवाळीनंतरचा रविवार (26 ऑक्टोंबर 2025) म्हणजे अनेक अंगाने अभिष्टचिंतनासाठी योग्य दिवस. अभिष्टचिंतन म्हणजे व्यक्तीने आजपर्यंत जे कार्य केले आहे, त्यात त्यांना अधिक उत्कर्षाच्या इच्छेसह निरोगी व आनंददायक उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा. या देताना सांगावेसे वाटते की पुढील त्यांच्या शतक महोत्सवी कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी तयार राहायचं आहे. हे सांगण्याचं कारण असं की तात्यासाहेब उर्फ किरणजी पिंगळे हे चिरतारुण्य लाभलेलं एक हसतमुख व्यक्तिमत्व. मी जेंव्हा प्रथमता 1997 ला नोकरीच्या निमित्ताने डोंबिवलीत आलो, तेव्हा बघितलेले तात्यासाहेब आणि आज 2025 म्हणजेच एक्काहत्तरीच्या निमित्ताने बघत असलेले तात्यासाहेब. काहीही फरक नाही. म्हणजे ते माझ्या मते शतकपूर्ती करताना सुद्धा असेच असतील. याबाबत शंका नाही. पण त्यांनी बघितलेले स्वप्न, पूर्णत्वास नेण्यासाठी घेतलेला ध्यास, त्यासाठी असलेले नियोजन, आव्हानांना तोंड देण्याची क्षमता, आत्मविश्वास, त्यांच्या उर्वरित आयुष्यातील राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील होणारी प्रगती पाहता सेंचुरी मारतानाचा कार्यक्रम याहुनी भव्य दिव्य आणि रुबाबदार असेल.
मी उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानमंदिर विद्यालयात 1997 ला रुजू झालो. तेव्हा संस्थेच्या अध्यक्षपदावर तात्यासाहेब होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने आम्हां सर्व शिक्षकांना दिलेले स्वप्न आज ज्ञानमंदिर विद्यासंकुल च्या रूपात साकार होताना दिसत आहे. खरं तर हा गेल्या 27 वर्षाचा कालखंड राज्यातील मराठी शाळांसाठी अतिशय संघर्षाचा. पण तात्या साहेबांच्या अध्यक्षपदाखाली इ.स. 2000 ला एम.आय.डी.सी. तील नवीन वास्तुत स्थलांतरित झालेली ही शाळा आज टोलेजंग रूपाकडे वाटचाल करतांना दिसते. तात्यासाहेबांनी जागेच्या भूमिपूजनासाठी त्यावेळी देशातील सर्वोच्च नेते स. श्री. अटलबिहारी वाजपेयी यांना आणण्याचा चंगच बांधला होता पण काही किरकोळ कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत. यावरून सुद्धा तात्या साहेबांची ध्येये आणि उद्दिष्टे याची कल्पना येते. तात्यासाहेबांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पूर्वेला एमआयडीसीत बांधकाम पूर्ण करून शाळा उत्कृष्टपणे सुरू करण्याचे बघितलेले स्वप्न, त्या सोबत प्राथमिक विभाग ही सुरू केला. तत्पूर्वी डोंबिवली पश्चिमेला सी.एम.एस. मध्ये असताना ज्युनिअर कॉलेज सुरू केले आणि त्यानंतर 2002 मध्ये मुक्त विद्यापीठाच्या रूपात सीनियर कॉलेजही सुरू करून ज्ञानमंदिर विद्यासंकुलाच्या भविष्यकाळातील भवितव्याची आणि प्रगतीची चिंताच मिटवली. त्यांच्या प्रेरणेने स. मुख्याध्यापिका सौ. संगीता प्रकाश पाखले मॅडम व त्यांच्या सोबत ची संपूर्ण टीम आजही जोमाने काम करत आहे. आज ज्ञानमंदिर विद्या संकुलात सुमारे 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. आजच्या प्रतिकूल मराठी शाळांच्या परिस्थितीत हे कार्य म्हणजे अनेक मैलांचा दगड ठरला आहे. खरंतर ज्ञानमंदिर विद्यासंकुलाला त्यांनी आपली नाही तर माझी शाळा असे मानले. तेथे होणारे विविध उपक्रम, कार्यक्रमात अगदी सूत्रसंचालनापासून प्रत्येक गोष्टीवर त्यांची तीक्ष्ण नजर होती. माझी शाळा तिचं नाव फक्त डोंबिवली पुरतं न राहता महाराष्ट्र, भारतातच नव्हे ते जगाने तिची दखल द्यावी असे काम करण्याची प्रेरणा त्यांनी सातत्याने शिक्षकांना दिली. याचाच परिणाम म्हणून आज शाळा यशाची वेगवेगळी शिखरे पदक्रांत करत पुढे जात आहे. यावर्षी जगात नंबर एक ठरलेली पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील, जालिंदर नगरची, वारे गुरुजींची, जिल्हा परिषदेची शाळा असली, तरी अशीच प्रगती आपल्याही शाळेत होत असल्याने लवकरच आपल्यालाही त्या ठिकाणी पोहोचता येईल, अर्थात हे सर्व ‘अशक्य ते शक्य’ तात्या साहेबांसह समाजातील अनेक समाजधुरीनींच्या प्रेरणेमुळेच.
वैयक्तिक तात्या साहेबांचे जीवन प्रचंड संकटांनी आणि खाचखळग्यांनी भरलेले आहे. पण कोणीतरी म्हटलं आहे त्याप्रमाणे, “कितीही संकटे आली तरी मोठी स्वप्ने पाहता येतात, नव्हे ती सत्यात उतरवता येतात, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे सर्वांचे डोंबिवलीकरांचे लाडके तात्यासाहेब.” म्हणूनच आमचे तात्यासाहेब अजातशत्रू ठरतात ते याच अंगीभुत गुणांमुळे.
आपण स्वीकारलेलं काम प्रामाणिकपणे करणे हीच आज राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रसेवा आहे, देशप्रेम आहे, आणि देवभक्ती सुद्धा आहे. हे सांगण्याचं कारण असं की या देशातील प्रत्येक नागरिकाने तात्या साहेबां प्रमाणेच सतत कार्यमग्न राहत आपले काम प्रामाणिकपणे केले, कोणतेही कारणं दिली नाहीत उदा. आता वय झालंय, थकवा आला, कंटाळा आला, यावर मात करत काम केलं तर हा देश आत्मनिर्भर होऊन विकसित व्हायला फारसा वेळ लागणार नाही हे निश्चित.
शेवटी एक महत्त्वाचे तात्या साहेबांनी आज सर्वच दृष्टीने मिळविलेल्या उत्तुंग यशात त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा वाटा आहेच. त्यामुळे त्यांच्या प्रतिही शुभेच्छा व्यक्त करत माझ्या लेखणीला विराम देतो.
धन्यवाद..
✒️मनोगत
श्री. प्रशांत पुंडलिक शिरुडे
सहशिक्षक
के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली.
9967817876
prashantshirude1674

