देवगड :
तांबळडेग येथील प्रसिद्ध भजनी बुवा मोहन जगन्नाथ कुबल यांनी आज सकाळी १०.४५ वाजता आपल्या राहत्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ते मुत्यु समयी ८२ वर्षांचे होते. वयोमानानुसार त्यांना प्रकृती साथ देत नव्हती. श्री. कुबल यांनी आपली पूर्ण ह्यात संगीत हाच श्वास समजून सेवा दिली. गावच्या उत्सवात ते नेहमी सहभागी असायचे आजवर त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांनी उदरनिर्वाहासाठी टेलरिंग आणि छोटेखानी मच्छीमारी व्यवसाय केला. त्यापूर्वी त्यांनी काही काळ रत्नागिरी येथे हौशी कलाकारांसाठी नाटकाचे दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी देवगड परिसरात बऱ्याच नाटकांसाठी संगीत साथ दिली होती. तसेच कित्येक गावच्या पांडुरंग सप्ताहात अभंग गायन, वादन केले. बऱ्याच हौशी मंडळींना मोहन कुबल यांनी घडविले होते. त्यांचा स्वभाव लोभसवाणा होता. त्यांच्या पश्चात मुलगा दिपक, दिलीप, मुलगी दिपाली, भाऊ विजय, विश्वास, सुधाकर, सनूबाई पुतणे असा परिवार आहे. त्यांच्यावर तांबळडेग येथील सागरतिर्थावर अंत्य संस्कार करण्यात आले. त्यावेळी संगीतप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होती. त्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते काका मुणगेकर यांनी मोहन कुबल यांच्या रूपाने तांबळडेग गावच्या संगीत मनमोहक हरपला असल्याचे सूचित करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देवगड भाजपा युवा नेते रविंद्र तथा पिंटू कोयंडे यांचे ते मामा होतं.
