मळगाव येथे ट्रक व दुचाकीची भीषण धडक;
दुचाकीस्वार गंभीर जखमी
सावंतवाडी
मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव-वेत्ये परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना दुपारी सुमारे बारा वाजता मळगाव येथील चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ट्रकखाली चिरडला जाऊन गंभीर जखमी झाला. घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीला रिक्षामधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
या अपघाताची माहिती वेत्ये येथील सरपंच गुणाजी गावडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई-गोवा हायवेवर वारंवार अपघात घडत असून, त्या ठिकाणी अॅम्बुलन्सची सोय नसल्याने जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी अॅम्बुलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
स्थानिक नागरिकांनी या अपघातानंतर महामार्गावरील बेफाम वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणावे व वाहतूक विभागाने येथे सतत गस्त ठेवावी, अशी मागणीही केली आहे.

