You are currently viewing सावंतवाडीत कॅफे मालकावर हल्ला

सावंतवाडीत कॅफे मालकावर हल्ला

सावंतवाडीत कॅफे मालकावर हल्ला

डोक्याला गंभीर दुखापत, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात गुरुवारी रात्री कॅफे मालकावर झालेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना रात्री सुमारे १०.३० ते ११.३० या वेळेत मँगो हॉटेलच्या आवारात घडली. हल्ल्यात कॅफे मालक मौहसीन शब्बीर तांबोळी (रा. कोलगाव दरवाजा, वैश्यवाडा, सावंतवाडी) गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार गावकर आणि सोहेल मुजावर (दोघेही रा. सावंतवाडी) हे चारचाकी वाहनातून मँगो हॉटेलच्या परिसरात आले होते. त्या वेळी त्यांच्या गाडीचा दरवाजा फिर्यादी मौहसीन तांबोळी यांना लागला. याबाबत तांबोळी यांनी विचारणा केली असता आरोपी संतापले आणि त्यांनी डस्टबिनच्या डब्याने तांबोळी यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी तसेच थपडा मारत मारहाण केली आणि शिवीगाळ केली.

या हल्ल्यात तांबोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सात टाके पडले आहेत. सध्या ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपी ओमकार गावकर आणि सोहेल मुजावर यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश जाधव करीत आहेत.

— संवाद प्रतिनिधी, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा