*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हा छंद जिवाला लावी पिसे*
धुंदमनी एकाकी मी गातो
देहभान विसरुनी जातो
नाद पैंजणी तुझाच भासे
हा छंद जिवाला लावी पिसे।ध्रु।
मंद वारा कसा बिलगतो
गंध स्पर्श तुझा जाणवतो
मिठीत यावे वाटतसे
हा छंद जिवाला लावी पिसे..
तव दिठीतली तेजकळी
कपोली लाजरी एक खळी
आठवून मी बेभान असे
हा छंद जिवाला लावी पिसे ..
डाव तो खट्याळ पावसाचा
आरस्पानी देह लावण्याचा
प्रणयात जीव गुंततसे
हा छंद जिवाला लावी पिसे..
हरित पानी पीत बहावा
बेचैन करी तुझा दुरावा
टिपुर चांदणे नभी हसे
हा छंद जिवाला लावी पिसे ..
*राधिका भांडारकर*
