विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथ भेट; वाचन संस्कृती वाढवण्यासाठी स्तुत्य उपक्रम
इंद्रायणी नगर, भोसरी: – पुणे येथील जागर प्रकल्प प्रकाशन संस्थेच्या वतीने इंद्रायणी नगर, भोसरी येथील श्री टागोर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच मोफत ग्रंथ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश कृतीत उतरवत, विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अन्य ज्ञानवर्धक आणि मनोरंजक पुस्तके उपलब्ध व्हावीत, या उदात्त हेतूने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
जागर प्रकल्प प्रकाशन संस्थेने विद्यालयाच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील पुस्तकांचे मोफत वितरण केले. यामध्ये कथा, कविता, चरित्र, विज्ञान, आणि प्रेरणादायी साहित्याचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्थेने घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी, जागरण प्रकाशन संस्थेचे प्रतिनिधी सारिका कळसकर व वसंत वसंत लिमये यांचे आभार व्यक्त करत विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या प्रतिनिधींनी वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. तर मुख्याध्यापकांनी जागर प्रकल्प प्रकाशन संस्थेचे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
या वेळी श्री टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे चेअरमन श्री नंदकुमार लांडे पाटील यांनी जागर प्रकल्प विषयी मत व्यक्त करताना म्हणाले “ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार असतात. जागरण प्रकल्प संस्थेने विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देऊन एक मौल्यवान भेट दिली आहे. या ग्रंथांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन विचार आणि दृष्टिकोन विकसित होण्यास मदत मिळेल. आम्ही जागर संस्थेचे आभारी आहोत आणि विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन करतो.”
या उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्साहाची लाट पसरली असून, ते मिळालेल्या पुस्तकांचे वाचन करण्यास उत्सुक आहेत. श्री टागोर माध्यमिक विद्यालयातर्फे जागरण प्रकाशन संस्थेचे पुन्हा एकदा आभार मानण्यात आले.
अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम साहित्य पोहोचण्यास मदत होते. या वाटपावेळी संस्थेचे सचिव सुरेश फलके, संस्था उपाध्यक्ष महेश घावटे, श्री टागोर विद्याल्याचे मुख्याध्यापक श्री संतोष काळे, लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हनुमंत आगे, श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री उद्धव ढोले व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा गुरव उपस्थित होत्या सर्व वाटप कार्यक्रमाचे नियोजन दिलीप पाटील, रवी खांदारे, संतोष सुलाखे, माया पाटोळे, विठ्ठल बुळे, गणेश फुगे व मस्तूद आबा यांनी परिश्रम घेतले.
