You are currently viewing २ नोव्हेंबरला आवळेगावात श्री देव नारायण जत्रा — कोकणातील भाविकांचा मेळा

२ नोव्हेंबरला आवळेगावात श्री देव नारायण जत्रा — कोकणातील भाविकांचा मेळा

कुडाळ :

सिंधुदुर्गातील वार्षिक जत्रोत्सवांची सुरूवात म्हणून ओळखला जाणारा ‘दहिकाला’ जत्रोत्सव आवळेगावच्या श्री देव नारायण मंदिरात रविवार, २ नोव्हेंबर रोजी पारंपरिक थाटात साजरा होणार आहे.

आवळेगावचे ग्रामदैवत श्री देव नारायण यांच्या मंदिरात कार्तिकी महिन्यातील भागवत एकादशी दिवशी हा जत्रोत्सव भरतो. या दिवशी सकाळी ७ वाजता ब्राम्हणवृंदाकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक होईल. सकाळी १० वाजता श्री दत्त मंदिर ते विठ्ठल मंदिर अशी पायी दिंडी आणि हरिपाठ होणार आहे.

सकाळी ११.३० वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. नितेश महाराज रायकर (गडहिंग्लज) यांचे कीर्तन होईल. दिवसभर माहेरवाशिणी व ग्रामस्थ देवाची ओटी भरणार आहेत. रात्री ११.३० वाजता श्रींची पालखी काढली जाईल, तर रात्री १२.३० वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक सादर होईल.

ही कोकणातील पहिली जत्रा असल्याने मुंबई-गोवा तसेच सिंधुदुर्गभरातून भाविक आणि दशावतारी नाट्यप्रेमींची मोठी गर्दी अपेक्षित आहे. मंदिर परिसरात खाज्या, खेळणी तसेच नव्या पिढीच्या आवडीचे शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल असेल.

कार्तिकी एकादशी असल्याने नारायण मंदिराशेजारील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरालाही भक्तांचा विशेष ओघ असतो. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी तुळशीविवाह करून उत्सवाची सांगता केली जाईल.

आवळेगावचे मानकरी, बंधु आणि ग्रामस्थांनी सर्व भाविकांना या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा