कणकवली
माजी खास.निलेश नारायण राणे यांनी दि.०९/०२/२०२१ रोजी एका व्हिडीओ क्लिपव्दारे शिवसेना सचिव खास.विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध अपमानास्पद प्रक्षोभक विधान करून खास.विनायक राऊत यांना मारहाण करणार अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी माजी खा.निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले व शिवसेना शिष्टमंडळ यांनी कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच याप्रश्नी शिवसेनेकडून काही विपरीत घडल्यास याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ही यावेळी दिला.
कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने निवेदन सादर करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले,उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, सुजित जाधव, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, सचिन सावंत, अँड हर्षद गावडे, राजु राठोड, युवासेनेचे गीतेश कडू, निसार शेख, संदेश पटेल, सोमा गायकवाड, अनुप वारंग, रुपेश आमडोसकर, प्रसाद अंधारी, विलास गुडेकर, रश्मी बाणे, वैभव मालंडकर, बाळू मेस्त्री, रिमेश चव्हाण, समीर परब, प्रकाश मेस्त्री, तेजस राणे, राजू कोरगावकर, लुकेश कांबळी, शरद सरंगले, साई कोदे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, माजी खास.निलेश राणे यांनी शिवसेना सचिव खास.विनायक राऊत यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच निलेश राणे धमकी देत असलेली व्हिडीओ क्लिप मीडियामध्ये प्रसारित झाल्याने खास.विनायक राऊत यांचा अपमान केला गेला आहे. तरी माजी खास.निलेश राणे याच्याविरुद्ध खास.विनायक राऊत यांना धमकी दिल्याबद्दल तसेच अपमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.