सावंतवाडी / मळगाव:
कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या तीन दिवसीय कुमार वाचक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन मळगावच्या सुकन्या तथा व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलच्या सहाय्यक प्राध्यापिका कु. सिद्धी हेमंत खानोलकर तसेच वाचनालयाचे अध्यक्ष श्री महेश खानोलकर यांच्या उपस्थितीत शारदेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी बोलताना कु. सिद्धी खानोलकर यांनी आपण ग्रंथालयाच्या बालवाचक शिबिरातून घडले. मला वाचण्याची आवड निर्माण होऊन बालवाचक शिबिरामुळे माझा व्यक्तिमत्व विकास झाला. वाचनामुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. याकामी त्यावेळी मला प्रा.विजयकुमार फातर्पेकर, सौ.पद्मा फातर्पेकर व श्री रवींद्रनाथ (भाई) कांबळी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यावेळी त्यांनी मुलांना आवडीने वाचन करा आणि वाचनाने समृद्ध व्हा, असा संदेश दिला.
शिबिराच्या पहिल्या दिवशी सावंतवाडी येथील प्रसिद्ध रंगकर्मी श्री सचिन धोपेश्वरकर यांनी आपलं बोलणं, आपले विचार स्पष्ट, स्वच्छ, शुद्ध शब्दात कसे मांडावेत याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नाट्यछटा, कथाकथन, अभिवाचन म्हणजे काय..? हे सांगून एक नाट्यछटा वाचून मुलांना प्रात्यक्षिक दाखविले.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी बांदा पानवळ येथील गोगटे जोगळेकर कॉलेजचे प्रा. एन. बी. कार्वेकर यांनी नाट्य व व्यक्तिमत्व विकास याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कलेतून व्यक्तिमत्व विकास होतो पुस्तकांची नाते जोडा वाचन करा व आनंदी राहा असे मार्गदर्शन करून शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे चार गट पाडून प्रत्येक गटाला एक नाट्यछटा विषय देऊन सांघिक नाट्यकृती कशी सादर केली जाते याबाबत मार्गदर्शन केले तसेच तीन मिनिटांची लेखी प्रश्नमंजुषा घेऊन शिबिरात रंगत आणली.
शिबिराच्या तिसऱ्या दिवशी मळगावचे सुपुत्र इतिहास प्रेमी श्री ज्ञानेश्वर गोविंद राणे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी इतिहास विषयावरील ग्रंथ, हस्तलिखिते, शिवकालीन शस्त्रे, नाणी यांचे दुर्गमावळा प्रतिष्ठानच्या सहकाऱ्याने प्रदर्शन मांडले होते. यावेळी त्यांनी मुलांना शिवकालीन शस्त्रांची ओळख करून देत शस्त्रांचे प्रात्यक्षिक करून घेतले. त्याचप्रमाणे इतिहास म्हणजे काय हे सांगून सर्वांनी शिवचरित्राचे वाचन करावे असे आवाहन केले. या तीन दिवसीय कुमार वाचक शिबिरात मुलांनी आपापल्या आवडीचे पुस्तक निवडून त्याचे एक तास वाचन केले यावेळी त्यांना प्रमुख मार्गदर्शकांनी योग्य ते मार्गदर्शन केले. शिबिराची सुरुवात तिन्ही दिवशी कुमारी मधुरा खानोलकर हिने तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे या प्रार्थनेने केली तसेच श्री नितीन वराडकर यांनी तिन्ही दिवशी पसायदान सादर केले.
खानोलकर वाचनालयात पार पडलेल्या शिबिरात २५ शिबिरार्थींनी भाग घेतला होता तिन्ही दिवशी शिबिरार्थी मुलांना अल्पोपहार देण्यात आला. ग्रंथालयाच्या कार्यवाह सौ स्नेहा खानोलकर व श्री रितेश राऊळ यांच्या मेहनतीमुळे सदरचे शिबिर यशस्वीपणे पार पडले. या कार्यक्रमाला संचालक मंडळ कर्मचारी वर्ग व पालक उपस्थित होते.
