You are currently viewing तृप्तलो आता

तृप्तलो आता

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य ज्येष्ठ कवी वि. ग. सातपुते यांच्या काव्याचे सौ.गौरी चिंतामणी काळे यांनी केलेलं रसग्रहण*

 

*तृप्तलो आता*

———————

मालवुनी टाक रे , दीप तू आता

मन शांत जाहले , तृप्तलो आता..

 

उजळल्या अंतरी , नाना गतस्मृती

थकलो स्मृतींचे , भार पेलता पेलता..

 

कोवळी मध्यान्न , गेली सांजाळूनी

सांजेसवे लपली , यामिनीच आता..

 

निवता लोचने , हुरहुर स्पंदनांना

चैतन्य सरता सरता जागे अंतरात्मा..

 

मालवुनी टाक रे , दीप तू आता..

मन शांत जाहले , तृप्तलो आता..

—————————————-

*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞 ( 9766544908 )*

 

आदरणीय वि.ग. सातपुते अप्पांची *तृप्तलो आता* ही रचना पैलतीर गाठत असणाऱ्या मनुष्याची परमेश्वराला आर्त विनवणी आहे.

 

*मालवुनी टाक रे ,दीप तू आता*

या पहिल्याच ओळीत मनुष्य जन्माला दिव्याची किंवा ज्योतीची उपमा दिली आहे.

प्रत्येक शरीरात प्राणरुपी चैतन्य जागवतो सर्वसाक्षी परमेश्वर.त्याच्या इच्छेनेच जीव जगात येतो व आपले कार्य पूर्ण करुन येथून प्रस्थान करतो.तरी ही कविवर्य येथे ईश्वराला विनवणी करतात कि माझी प्राणज्योत मालवून टाक अर्थात ती तुझ्यात विलीन कर.मी एक परिपूर्ण आयुष्य जगलो ,आता मन शांत तृप्त आहे …फक्त तुझ्या भेटीची मज आस लागली आहे.

या जन्मात खूप व्यक्ती भेटल्या ,अनेक नातेसंबंध जुळले.कित्येक हृदयस्पर्शी घटनांचा मी साक्षीदार ठरलो.कैक कडू गोड आठवणींनी माझे जीवन समृद्ध केले .हे ईश्वरा आता त्या आठवांचा भार पेलताना जीव थकला आहे.त्या सर्व आठवणी मागे टाकून आता फक्त तुझे रुप ,तुझी आठवण मनात रुंजी घालत आहे.

*कोवळी मध्यान्न , गेली सांजाळूनी*

या ओळीत श्री. विगसा अप्पांनी रुपकाचा उत्तम वापर केला आहे.*कोवळी मध्यान्न* अर्थात मनुष्याचे बालपण व तारुण्य.कविवर्य म्हणतात माझे बालपण व तारुण्य ही आता सरुन गेले.आता वार्धक्य आले..जीवनी सावळ्या सांजेने प्रवेश केला आहे पण संध्या समयी नंतर येणारी अंधारी रात्र जणू लोपली आहे कारण मिटल्या नयनांना आत्मज्ञानाचा प्रकाश लाभला आहे.

*चैतन्य सरता सरता* अर्थात कुडी अचेतन होताना प्राणज्योत तुझ्या शिवस्वरुपात विलीन होण्यासाठी आतुर आहे.नयन पाकळ्या मिटताना हृदयातील स्पंदनात जाणीवेची हुरहूर आहे तरी ही मनाला तृप्तता व शांतता लाभली आहे.हे परमेश्वरा माझे येथील कार्य पूर्ण झाले…आता माझा जीवन दीप तू मालवून टाक.

 

सौ. गौरी चिंतामणी काळे

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा