देवगड :
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर देवगड तालुक्यातील पडवणे येथील प्रकाश शिर्सेकर यांच्या आंबा बागेतून निघालेल्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सहा डझन हापूस आंब्यांची ही पेटी मुंबईतील वाशी एपीएमसी फ्रूट मार्केटमधील मे. नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी (गाळा क्र. J-४३४/४५५) यांच्या गाळ्यात लिलावासाठी आली होती. या पहिल्याच पेटीला तब्बल ₹२५,००० चा विक्रमी दर मिळाला.
आंबा बागायतदार प्रकाश आणि समीर शिर्सेकर यांच्या बागेत यावर्षी जून-जुलै महिन्यातच हापूसचा मोहोर आला होता. ऐन पावसाळ्यात आलेला मोहोर टिकवणे हे मोठे आव्हान असतानाही, शिर्सेकर कुटुंबाने झाडांवर आच्छादन करून आणि अत्यंत काळजीपूर्वक निगा राखत हा मोहोर जपला. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून दिवाळीच्या हंगामातच हापूसची पहिली पेटी बाजारात आली आणि विक्रमी दराने विकली गेली.
हर्षल जेजुरकर यांनी सांगितले की, “आमच्या तीन पिढ्यांच्या व्यापार इतिहासात प्रथमच लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आंबा विक्री झाली असून, हा दिवस आमच्यासाठी अत्यंत समाधानाचा ठरला.”
देवगड हापूसची आगळीवेगळी चव आणि सुवास दिवाळीच्या सणात अधिक गोडवा आणणारा ठरला आहे. व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून, कोकणच्या मातीतून आलेल्या या हापूसने दिवाळीला अक्षरशः “सुवर्ण सुगंध” दिला आहे.
