You are currently viewing रिकामे मधुघट – भा.रा.तांबे

रिकामे मधुघट – भा.रा.तांबे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. ऐश्वर्या डगांवकर यांनी माननीय राजकवि भा.रा‌. तांबे यांच्या कवितेचं केलेलं रसग्रहण*

 

*रिकामे मधुघट – भा.रा.तांबे*

 

मधु मागशि माझ्या सख्या, परी

मधुघटचि रिकामे पडती घरी !

 

आजवरी कमळाच्या द्रोणी

मधु पाजिला तुला भरोनी,

सेवा ही पुर्विची स्मरोनी,

करी न रोष सख्या, दया करी.

 

नैवेद्याची एकच वाटी,

अता दुधाची माझ्या गाठी;

देवपुजेस्तव ही कोरांटी

बाळगी अंगणी कशी तरी.

 

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज

वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज

संसाराचे मर्म हवे तुज

मधु पिळण्या परि बळ न करी !

 

ढळला रे ढळला दिन सखया !

संध्याछाया भिवविति हृदया,

आता मधुचे नाव कासया ?

लागले नेत्र हे पैलतिरी.

 

 

दुर्धर आजाराने काही काळ ग्रस्त झाले असतांना मृत्युदर्शनाच्या अनुभूतीतून या कवितांमधून वेदनांच्या सरी कोसळतात.रसिकाने कविता मागताच

‘मधु मागशी माझ्या सख्या परि

मधुघटची रिकामे पडती घरि

आता मधुचे नाव कासया

लागले नेत्र हे पैलतीरी.

 

राजकवी भा.रा.तांबे यांची ही कविता त्यांच्या शेवटच्या दिवसातील आहे.या कवितेचे अनेक गूढ अर्थ आहेत.ज्याप्रमाणे बालकवींची औदुंबर ही कविता अनेकार्थात उलगडली जाते.

अतिशय सुमधुर आणि गूढ गुंजन करणारी ह्या कवितेचे शीर्षकच खूप काही सांगून जाते

रिकामे म्हणजे रिक्त मधुघट ही तांब्याची काव्यप्रतिभा.जी त्यांना शेवटच्या दिवसात क्षीण झाल्यासारखी भासते. त्यांच्याकडून रसिक साहित्यिकांना खूप अपेक्षा होत्या.अगदी ते अंथरूणाला खिळले असतांना देखील लोक त्यांना काव्य लिहीण्याचा आग्रह करत होते.त्यांचा आग्रह त्यांना मोडवेना म्हणून त्यांनी ही कविता रचली.ते म्हणतात ,

आता तुम्ही माझ्याकडून काव्याची अपेक्षा करू नका.आता मी थकलो आहे.आजपर्यंत मी तुम्हाला कामळाच्या द्रोणात भरभरून काव्यरस पाजला आहे.कमळाचाच द्रोण का तर तो विशाल आणि कोमल असतो.त्यांचे काव्य हे कमळा प्रमाणेच सुंदर तरल ,कोमल आणि संवेदनशील होते.ते म्हणतात की त्यांनी केलेली काव्य सेवा आठवा आणि आता ती मी देऊ शकत नाही म्हणून राग मानू नका .माझ्यावर दया करा .पहा किती आर्जव ,मृदुता त्यांच्या काव्यात आहे.

माझ्याजवळ आता फक्त एकच छोटीशी काव्याची वाटी आहे ती कशी तर नेवैद्य दाखवण्याची आणि हा नेवैद्य ते कुणाला दाखवणार तर तो शेवटच्या क्षणी देवाला अर्पण करणार आहेत.देवपूजेस्तव ही कोरांटी म्हणजे बाकी सुंदर अशी काव्यसुमने मी आजपर्यंत तुम्हा सर्वांना दिली.पण आता फक्त हे कोरांटीचे फूल कसेतरी मी बाळगले आहे.जीवनाच्या शेवटच्या सीमेवर ते बाळगले आहे. कुठल्याही बागेच्या कडेकडेने राखण करणारे कुंपण असते .तेही काटेरी तर च बागेचे रक्षण करता येते.काटेकोरांटीच्या झाडाला पण काटे असतात.परंतु फुल अतिशय कोमल आणि सुगंधहीन असतं परंतु त्यांच्या देठाशी मात्र मधाप्रमाणे गोड असं द्रव्य असतं आणि ते चिकट असतं .तेच फूल त्यांनी देवाला अर्पण करण्यासाठी ठेवलं आहे.परंतु मला असं वाटतं की ते फूल म्हणजे शेवटचं ते काव्य त्यांच्या काव्यप्रतिभेचं सत्व आहे.आणि ते काव्य म्हणजे ही कविता .

रसिकांनी त्यांच्या भावकविता अतिशय आवडत्या त्याच्यातून काही लोकांना जगण्याचा अर्थ लागायचा तर काहींना जीवनाचे ध्येय समजून घ्यायचे असायचे.अनेक प्रेमी युगुलासाठी त्यांनी अशा सुंदर कविता लिहील्या , निसर्ग कविता लिहील्या.गूढ अशा कविता लिहील्या पण आता ती संपदा,ती प्रतिभा त्यांच्यात राहिली नाही अशी कबुली पण ते देत आहे.आता तो काव्य रस पाजण्याचे बळ त्यांच्यात राहिले नाही असे वारंवार सांगत आहेत.

आता आयुष्याची संध्याकाळ पण सरत आली आहे.एक अनामिक अशी भिती मनात दाटून आली आहे.साहजिकच आहे सर्वसामान्य माणसाला मृत्यूचे भय मनात असतेच अशावेळी त्यांना काव्य कुठून सुचणार.ते म्हणतात आता त्यांच्याकडून ती अपेक्षा करणं ही चुकीचे आहे.वारंवार आर्जव करून त्यांना लज्जित करू नका.आता त्यांचे नेत्र पैलतीरावर लागले आहे.इथे मला बालकवींच्या ‘ औदुंबर ‘कवितेची आठवण येते.मानवी जीवन हे एका सरित प्रमाणे असते.दोन किनारे म्हणजे जीवन हा ऐलतीर आणि मृत्यू हा पैलतीर. या दोन तीरांच्या मध्ये वाहणारी ही सरिता.कवींना आता पैलतीर दिसत आहे.अतिशय आर्तता प्रदान करणा-या शेवटच्या चार ओळी.मनाला दिग्मूढ करून जातात.शेवट दिसत असताना त्यांच्याकडून काव्याची अपेक्षा करू नका आता फक्त छोटी नेवैद्याची वाटी आणि कोरांटीचे फूल त्यांनी सांभाळून ठेवले आहे.

या कवितेचा आणखी एक अर्थ असाही जाणवतो तो म्हणजे त्यांनी सखया हा शब्द ईश्वरा साठी पण वापरला असावा.यातही गूढ अर्थ दडला आहे.की,’ मी आजपर्यंत तुझी सेवा केली वेगवेगळ्या प्रकारांनी तुझी सेवा केली परंतु

अंथरूणाला खिळल्यामुळे आता मी ती नीट करू शकत नाही.तरी तू रागावू नकोस.आता कशीबशी एका छोट्याशा वाटीतच तुला नेवैद्य दाखवतो कारण आता या कुडीत बळ राहिलं नाही.अंगणात बाग राहिली नाही.पण कसंबसं जपलेलं एक कोरांटीचं झाड आहे तेच फूल मी तुला वाहू शकतो

तुझ्या कृपेने तरुणपण निसर्ग सान्निध्यात खूप वेळ घालवला

लोकांमध्ये रमलो ,स्तुतीसुमने स्वीकारली.लोकांना काव्यरूपाने आनंद दिला परंतु तुला जे माझ्याकडून हवं होतं ते म्हणजे भक्ती ती करू शकलो नाही याची खंत मनाला

जाणवत आहे.पण आता वेळ निघून गेली.आता मात्र माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत.कारण आता मृत्यूचे सावट संध्याछाया च्या रुपात जाणवत आहे.आता तुला भेटायची वेळ जवळ आली आहे.मग मी रिक्त हाताने कसा येऊ हा विचार मनात येत आहे.

म्हणून तुला अर्पण करण्यासाठी ठेवलेली ही नेवैद्याची वाटी आणि कोरांटीचे फूल मात्र मी फक्त तुलाच अर्पण करणार आहे.

खरंतर त्यांचे हे शेवटचे काव्य हीच त्यांची कोरांटी आणि नेवैद्याची वाटी असावी इतकी सात्विकता प्रामाणिक पणा आणि नम्रता यात दिसून येते.

वरवर दिसून येणारा एक अर्थ असाही असावा की जीवनाच्या संध्याकाळी एखाद्या पत्नीने आपल्या पतीला उद्देशून केलेले काव्य असावे.जी जीवनभर त्याची सेवा करते आणि काही कारणास्तव नंतर करू शकत नसावी म्हणून ही अगतिकता पण या कवितेतून जाणवते.

 

सौ ऐश्वर्या डगांवकर पुणे

भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५.

प्रतिक्रिया व्यक्त करा