मुंबई :
ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दहिसर, मुंबई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंगाराम गवाणकर यांच्या तब्येतीत चढ-उतार सुरू होते, दहिसर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गंगाराम गवाणकर हे एक प्रसिद्ध मराठी आणि मालवणी नाटककार होते, जे त्यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकासाठी ओळखले जातात. त्यांनी २० हून अधिक नाटके लिहिली, ज्यात ‘वन रूम किचन’ आणि ‘दोघी’ ‘वात्रट मेले’ यांचा समावेश आहे. त्यांनी १९९८ च्या ‘जागर’ या मराठी चित्रपटासाठी संवादही लिहिले. त्यांनी लिहिलेल्या वस्त्रहरण नाटकानंतर मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या विशेषतः मालवणी बोलीतील नाटकांचा उदय झाला. त्यांना ‘मानाचि संघटने’चा लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार मिळाला होता. सावंतवाडी येथे एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. लेखक म्हणून ते उत्तम होतेच परंतु माणूस म्हणून ते नक्कीच श्रेष्ठ होते. सावंतवाडी संमेलनाच्या दरम्यान त्यांनी आपण मुंबईतील स्मशानच्या शेजारी रस्त्यावर झोपडीत राहून आज इथपर्यंत यशस्वी झालो, तसेच लंडन वारीच्या गमती जमती सांगितल्या होत्या.
त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि नाट्यसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
