सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्थेचा उपक्रम; विजेत्यांसाठी रोख पारितोषिके आणि चषकांची आकर्षक रचना
देवगड :
सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्थेतर्फे जिल्ह्यातील पारंपरिक भजनकलेला नवे व्यासपीठ मिळावे यासाठी यंदा प्रथमच ‘पालकमंत्री चषक २०२५’ या तालुकास्तरीय भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये या स्पर्धांचा भव्य सोहळा पार पडणार असून त्यातील प्रारंभिक स्पर्धा देवगड तालुक्यात होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन मत्स्योद्योग व बंदर विकासमंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवार, २६ ऑक्टोबर रोजी देवगड येथील श्री देव कुणकेश्वर मंदिरात होणार आहे.
स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीस संरचना ठेवण्यात आली आहे — प्रथम पारितोषिक ₹१०,०२३, द्वितीय ₹५,०२३, तृतीय ₹३,०२३, तर उत्तेजनार्थ ₹२,०२३ रुपये इतकी आहेत. याशिवाय उत्कृष्ट गायक, वादक, तबलावादक आणि कोरस कलाकारांना प्रत्येकी ₹१,०२३ चे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
विजेत्यांना आकर्षक चषक देखील प्रदान केले जाणार असून संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले आहे. तालुक्यातील सर्व भजन मंडळांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी केले आहे.

