*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आता.. रोजच दिवाळी…*
आता रोजच दिवाळी घराघरात चालते
नवी पिढी परिणाम त्याचे खूपच भोगते
नाही कशाचीच कमी लाड मुलांचे फाजिल
गोष्ट एक मागताच दहा, हातात देतात…
खचं पडतो घरात रोज पार्सले येतात
ॲानलाईनच सारे कष्ट कुठे लागतात
पैसा फेको तमाशा देखो,चव राहिलीच नाही
शब्द झेलते अलगद कमावती आहे आई..
नाही ऐकण्याची सवय ठेवलीच नाही आता
एक मागताच गोष्ट दहा लागतात हाता
संयमाचे नाही नाव भांडे पडले उपडे
एकुलते एक मूल स्वैर उधळते घोडे….
हट्टी होते मग मूल तेव्हा येती नाकीनऊ
साऱ्या बिघडून सवयी म्हणती कशा सुधरवू?
बालवयातच सारे द्यावे संयमाचे धडे
नाहीतर उतरंड पहा सारी सारी गडबडे…
बोलण्याचा सांगण्याचा नाही राहिला हो धर्म
फक्त गंमत बघावी आहे ज्याचे त्याचे कर्म
सांगणारा ठरे वेडा झालो कालबाह्य आता
काळ बदलला म्हणे घेईल पाहून तो “धाता”..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
