You are currently viewing दिवाळीनंतर

दिवाळीनंतर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्य रचना*

 

*दिवाळीनंतर* (शिरोमणी रचना)

 

दिवाळीनंतर….

फटाक्यांच्या चिंधड्या

राॅकेट आले भुईवर

विझलेल्या फुलझड्या

पसरल्या कोपराभर….

 

दिवाळीनंतर….

क्षीण दीपमाळा

आकाश कंदील हेलकावला

रांगोळीतील रंग विस्कटत चालला…..

 

दिवाळीनंतर….

फराळाचे डबे

मोठ्यातून छोटे झाले

गोल चकलीचे तुकडे उरले…

 

दिवाळीनंतर….

चिवडा तळाला

साखर खसखस तीळ

उरली केवळ डब्यात चवीला…

 

दिवाळीनंतर….

अख्खा लाडू

कुठं शोधून मिळेना

खायचा उरलासुरला वेचून बेदाणा….

 

दिवाळीनंतर…

कपाटात जातात

जरीकाठाच्या साड्या पैठण्या

मौल्यवान दागिन्यांची रवानगी कुलुपात….

 

दिवाळीनंतर

लेकी सासरी

नातवंड मुलंसुना निघता

होतो घराचा चेहरा

उदासवाणा…..

 

दिवाळीनंतर

पूर्वीसारखं घर

मनही रिकामं शांत

उरतो वेळ पुन्हा निवांत….!!

 

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा