कधी ओढली होती वेणी |
कधी कपड्यांना हात पुसले होते
दारात अडवूनी तिजला |
एकट्याने खाऊ खाल्ले होते ||
दाखवून बॉम्बची भीती |
फटाके ही पळवले होते |
घेऊनी गाली चिमटा |
फराळ ही लाटले होते ||
ती रडूनी आईस सांगे |
आई बघ ना दादा छळतो |
लाडूचा तुकडा हाती देता |
राग तिचा भूर्कन पळून जातो ||
थोडे ही मज बरे नसताना |
ती आई सारखी होते |
औषध पाणी हाती देऊन |
लवकर बरा हो म्हणते ||
ती मैत्रीण , आई आणि |
सवंगडी होऊन राहते |
बांधून मनगटी राखी |
भाऊबीजेची वाट पाहते ||
ती होते सुभद्रा म्हणून मजला |
श्रीरंग ही होता येते |
काही ऋणातून मुक्ती |
आणि उतराई होणे नसते ||
देवाने दिलेली ही शक्ती |
नवचैतन्य घराला देते |
करुनी सन्मान बहिणीचा |
जीवनाचे सार्थक होते ||
भाऊबीजेच्या शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन !😊🙏
*संग्रह @अजित नाडकर्णी शुभांजित श्रुष्टि **
