You are currently viewing कुडाळात घरातील सदस्य झोपेत असतानाच चोरीचा धक्कादायक प्रकार –

कुडाळात घरातील सदस्य झोपेत असतानाच चोरीचा धक्कादायक प्रकार –

कुडाळात घरातील सदस्य झोपेत असतानाच चोरीचा धक्कादायक प्रकार – लाखोंचे दागिने लंपास

कुडाळ :

कुडाळ शहरातील श्रीरामवाडी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्व सदस्य झोपेत असतानाच एका अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. स्मिता तांडेल यांच्या घरातून ही चोरी झाली असून त्यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

स्मिता तांडेल या आपल्या कुटुंबासमवेत राहतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी पूजा सामग्रीत वापरलेले चांदीचे नाणे (₹४,०००/-) व सोन्याच्या पाटल्या (₹२२,५००/-) डबीत भरून देव्हाऱ्यावर ठेवले होते. तसेच, आपल्या गळ्यातील मंगळसूत्र (₹१,६२,०००/-) त्यांनी पिशवीत ठेवून उशीजवळ ठेवले होते. पहाटेच्या सुमारास घरात कुणीतरी असल्याचा भास झाला होता, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी उठल्यावर मागचा व पुढचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरीचा प्रकार लक्षात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी फॉरेन्सिक पथक व श्वान पथक बोलावले. श्वानपथकाने मागोवा घेतल्यावर घराजवळच रिकामी डबी सापडली. घरातील सून दुर्गा तांडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास पायऱ्यांजवळ काहीसा आवाज झाला होता, त्यामुळे चोरट्याने घरात वर जाण्याचा प्रयत्न केला असावा, मात्र हलचाली जाणवताच तो पळून गेला असावा असा संशय आहे.

एकूण चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे ₹१,८८,५००/- असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा