वार्धक्य
वार्धक्याने जपले आहे,
खेड्यामधले उघडे दार!
लक्ष ठेवण्या फिरते आहे,
पितरांची आभाळी घार!
अक्षराविणा दिसते येथे,
अदृश्याने लिहिले स्वागत!
अपरात्रीही बघा जाऊनी,
आपुलकी बसलेली जागत!
इथे भुकेला असुनी चटका,
येणाराचा राखिव घास!
निरोप घेता देह अंगणी,
तुमच्या मागुन येतो श्वास!
हवे-नकोच्या पल्याड गेली,
पसायदानी यांची दृष्टी!
घराघरातून समान शबरी,
तशीच बोरे चाखून उष्टी!
माणुसकीची तृषा अनावर,
डोळे म्हणजे फक्त प्रतिक्षा!
शेरा देईल नापासाचा,
अशी जगी या नाही परिक्षा!
भाव अंतरी किती देखणे,
होति सुरकुत्या सुंदर नक्षी!
मानभावी वा ढोंगी कोठून?
क्षणोक्षणी जर ईश्वर साक्षी!
उगाच नाही घाई,गर्दी,
शांतपणाने निजते वस्ती!
विकून याचा पैसा करण्या,
शहरामधुनी येईल मस्ती!
यांच्या निर्वाणाच्या नंतर,
पडेल छप्पर,पडतिल भिंती!
नोटा,नाणी,सोने,चांदी,
यात कोण मोजी श्रीमंती?
साक्षरतेने रोज शिकावी,
निरक्षरांची ओली भाषा!
मोहळ सुकले,मधही सुकला,
मेल्यावाचुन मेल्या माशा!
प्रमोद जोशी देवगड
९४२३५१३६०४
संग्रह अजित नाडकर्णी शुभजित श्रुष्टि
