‘कलंबिस्त तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है!’ — महेश सारंगांचा टोला, सरपंचांचा भव्य प्रवेश
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.
माडखोल जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचा करिष्मा अधिक तेजीत दिसून आला आहे. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात कलंबिस्त गावच्या सरपंच सौ. स्वप्ना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, ग्रामपंचायत सदस्य सौ. रिया राजेश सावंत आणि सौ. मेघा तावडे यांनी आज अधिकृतरीत्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
या प्रवेशावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. कार्यक्रमादरम्यान “कलंबिस्त तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है!” असा उपरोधिक टोला भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी लगावत विरोधकांना संदेश दिला.
या प्रवेशावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा बँक संचालक रवींद्र माडगावकर, माजी जिल्हा सदस्य पंढरी राऊळ, आंबोली मंडळ उपाध्यक्ष किरण सावंत, संतोष पालेकर, युवा मोर्चा आंबोलीचे निलेश पास्ते, स्वप्नील राऊळ, पुंडलिक कदम, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर आदींचा समावेश होता.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे संयमी नेतृत्व, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच युवा नेते विशाल परब यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा भव्य पक्षप्रवेश शक्य झाल्याचे मान्यवरांनी गौरवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र माडगावकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रल्हाद तावडे यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली.
दिवाळीच्या झगमगाटात झालेल्या या भाजपा प्रवेश सोहळ्याने सावंतवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

