*विठ्ठल नामाच्या गजरात घारपी शाळेची वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी*
विद्यार्थ्यांच्या भक्तिपूर्ण सहभागाने गावात विठ्ठलमय वातावरण
*बांदा*
रमा एकादशीच्या निमित्ताने घारपी येथील सातेरी माऊली मंदिरात आयोजित हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात जिल्हा परिषद घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या वारकरी दिंडीने भक्तिमय वातावरणात झाली. विद्यार्थ्यांच्या दिंडीने संपूर्ण गाव विठ्ठलमय झाले
या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी,संत व वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, “ज्ञानोबा माऊली – तुकाराम” च्या जयघोषात शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी सातेरी माऊली मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली.
विद्यार्थ्यांच्या सोबत या दिंडीत पालक, ग्रामस्थ, आणि शिक्षकवर्ग सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, पारंपरिक पद्धतीने गजर गायन करत तसेच काही ठिकाणी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी फुगड्या घालून भक्तीमय वातावरण तयार केले.
या दिंडीत शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे. धर्मराज खंडागळे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्षा यशोदा गावडे तसेच इतर सदस्य, पालक व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांची दिंडी मंदिरात पोहोचल्यानंतर सातेरी माऊली देवस्थान कमिटीकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि अल्पोपहार देण्यात आला .ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडीचे कौतुक केले.

