राज्य वाड़मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड़मय निर्मीतीसाठी प्रकाशन वर्ष 2020 करिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड़मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयामध्ये दिनांक 3 मार्च 2021 पर्यंत पाठविता येणार आहेत.
दिनांक 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या शीर्षाखालीही व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पुर्णतः भरुन आवश्यक त्या साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये दिनांक 3 मार्च 2021 पर्यंत पाठवाव्यात. लेखक/ प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
लेखक/प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद पाकिटावर/लिफाफ्यावर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड़मय पुरस्कार 2020 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. दिनांक 3 मार्च 2021 नंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.