*उड्डाण पुलाखालील रस्ता अधिकृत करा. अन्यथा एकमार्गी जाण्याचे आदेश द्या….*
*पूर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता पुन्हा सुरू करा.बांदा भाजपची मागणी….*
बांदा:-
येथील उड्डाणपूल वाहतुकीस सुरू करण्यात आले असून त्याखाली केवळ दोडामार्ग मधून बांदा शहरात येण्याकरिता रस्ता ठेवण्यात आला आहे. परंतु निमजगा रस्त्यावरून कट्टा कॉर्नर येथे येण्याकरिता रस्ता ठेवण्यात आलेला नाही. त्याकरता आज बांदा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या सावंतवाडी कार्यालयाला भेट देत कनिष्ठ अभियंता रोहित गवस यांना निवेदन देत मागणी केली.
त्यात त्यांनी म्हटले की, पूर्वीपासून हा रस्ता अस्तित्वात होता. परंतु महामार्ग बनतेवेळी तो थोड्या अंतराने पुढे नेण्यात आला. ज्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती आणि आत्ता तर उड्डाणपूल झाल्यावर केवळ दोडामार्ग मधून पलीकडे शहरात जाण्याकरिता रस्ता ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे सदर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शहरातील निमजगा, गडगेवाडी गवळीटेंब येथील स्थानिक तसेच त्या बाजूने येणारी सर्व गावे त्याचप्रमाणे कोल्हापूर बेळगाव व सावंतवाडी येथून येणारी शेकडो वाहने यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ज्यामुळे अनेकदा वाहतुकीच्या समस्या उद्भवत असतात.ज्याचा त्रास सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्गाला होत आहे. तसेच परत येणारी वाहतूक हे एकमार्गी रस्त्याने विरुद्ध दिशेने येते ज्यामुळे वारंवार किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. नियोजित
संकेश्वर-बांदा रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून भविष्यकाळात सदर काम पूर्ण झाल्यावर पुणे, कोल्हापूर, बेळगाव येथुन येणारी सर्व अवजड वाहतूक देखील याच रस्त्यावरून येणार आहे. त्यामुळे प्रचंड मोठी वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे. याकरिता पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेला निमजगा ते कट्टा कॉर्नर रस्ता अधिकृत करण्यात येऊन सदर रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करण्यात यावे. कारण सद्यस्थितीत हा रस्ता मातीचा असून खड्डेमय झाला आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. त्यामुळे अपघात होऊन माणसे दुखापत ग्रस्त होत आहेत. तरी याचा गंभीरतेने विचार करून तातडीने तो रस्ता अधिकृत करण्याची मागणी करण्यात आली व तसे न केल्यास एकमार्गी रस्त्याने जावे लागणार असल्याबाबतचे पत्र देण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात जीवितहानी झाल्यास त्यास राष्ट्रीय महामार्ग विभाग व अधिकारी जबाबदार असतील असे देखील सांगितले. महामार्ग विभागाने याची दखल न घेतल्यास लोकसहभागातून सदर रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल व गरज पडल्यास महामार्ग विभागाविरोधात आंदोलन करावे लागेल असा इशाराही दिला.
यावेळी बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, ग्रा.पं. सदस्य रत्नाकर आगलावे, सिद्धेश महाजन, दर्पण आळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

