*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट: ३५*
*नोकरी म्हंजे काय?*
काकल्याने आल्या आल्या एक करोडचा प्रश्न टाकला, “नोकरी म्हंजे काय?” बरं ऑप्शनही दिले नाहीत. मी थोडा बुचकळ्यात पडलो. नोकरीची निश्चित व्याख्या मलाही करता येईना.
“तुला काय म्हणायचं?” सोडवणूक करण्याच्या उद्देशाने मी प्रतिप्रश्न केला; पण काकल्या तयारीचा. तो म्हणाला, “तुका मी इचारलय, त्येचा तू उत्तर दी.”
मी मग काहितरी जोडणी करीत म्हणालो, “अरे नोकरी म्हणजे मोबदला घेत केलेले नियमित काम. ”
“म्हंजे तेच्यात पेन्शन, फंड अपेक्षित नाय?” काकल्याने स्पष्टीकरण मागितले.
“अरे, पेन्शन सरकारी नोकरीत वगैरे असते. सगळ्याच ठिकाणी ती असते असं नाही.” मी.
“मगे नेपाळी आंबेवाल्यांकडे, भैये काँट्रॅक्ट वाल्यांकडे, विजापूरचे चिरेवाल्याकंडे करतत; ते पून नोकरेच मां?” काकल्या मला अडचणीत आणू पहात होता.
” हो, त्यानाही नोकरी म्हणायला हरकत नाही.” मी म्हणालो.
“मगे भूमिपुत्र नोकरे नाय म्हून रडतत कित्याक?अशे पायल्याक पासरे नोकरे हत मरे हडे.” काकल्या मूळ मुद्द्यावर आला.
“तू सांगलेल्या नोकऱ्यात सुरक्षितता नसते, म्हणून मुलं त्या नाकारत असतील.” मी थोडा बचाव केला.
“अरे, तिठ्यार टवाळके करीत बसण्यापेक्षा, नायतर फुढाऱ्यापाठी लोंबकळण्या पेक्षा हे नोकरे वायट?”
मी गप्प राहिलो, कारण काकल्याचे तर्कट मला झेपत नव्हते.
पुन्हा तो म्हणाला, ” मागे नात्राक समाळूक बायल्माणूस सोदी होतय, तर तुझ्या सारख्या भल्या माणसान सांगला,’तुका चार हजारात बीकॉम क्लार्क दितय, पून असल्या घरकामाक स हजारात पण माणूस मेळाचा नाय.'”काकल्या सत्याच्या जवळच होता.
“पोरांका नोकरी म्हंजे सरकारी नोकरी होयी. काम कमी, सुटये चड, दादागिरी करूची सोय आणि फुकटची प्रतिष्ठा अशी हापिसातली नोकरी होयी हा. जी कमी होयत् चल्ला आणि येक दिस बंद पून जातली. सरकाराक फुकट नोकरशाही पोसूक जमाची नाय रे. ज्येची काम करूची इच्छा हा,त्येका नोकरे आसत. गावातच दिडेकशे भायले माणूस नोकरे करतहत. बेरोजगारी ह्यो निस्तो भ्रम आसा.” एक भीषण सत्य बोलून काकल्या जायला निघाला.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802
