*एसटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने कृती समितीकडून कणकवलीत आनंदोत्सव*
*मा.आ. वैभव नाईक यांनी सहभागी होत दिल्या शुभेच्छा*
*भविष्यातही कृती समितीने एकजुटीने आवाज उठविण्यासाठी सज्ज रहावे- वैभव नाईक*
एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेऊन राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यात आले. महत्वाच्या मागण्या मान्य झाल्याने आज कणकवली एसटी बसस्थानक येथे कृती समितीचे कामगार प्रतिनिधी व एसटी कामगार यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी या आनंदोत्सवात सहभागी होत एसटी कामगारांना शुभेच्छा दिल्या.यावेळी वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना खासदार तथा शिवसेना एसटी कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेनजी रेडकर, कार्याध्यक्ष प्रदीप धुरंधर आणि सुभाष जाधव यांच्या अथक प्रयत्नाने शिवसेना एसटी कामगार सेनेने एसटी मधील १८ संघटनांना एकत्र घेऊन एसटी महामंडळ संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. या कृती समितीच्या पहिल्याच प्रयत्नाला यश आले आहे.
यावेळी मा. आ. वैभव नाईक म्हणाले, महाराष्ट्रातील एसटी कामगारांची महायुती सरकारने दयनीय अवस्था केली आहे. विविध आश्वासने देऊन ती पूर्ण केली नाहीत. म्हणून एसटी कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आपली एकजूट दाखवली त्यामुळे सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. यापुढच्या काळातही अशीच एकजूट आपल्याला ठेवायची आहे. सरकारने रक्कम जरी जाहीर केली असली तरी सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने एखाद्या महिन्यात हि रक्कम देऊन सरकार पुन्हा रक्कम थकीत ठेवेल. त्यामुळे भविष्यातही आपल्या मागण्यांसाठी एकजुटीने आवाज उठविण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कृती समितीचे कामगार प्रतिनिधी अनुप नाईक, दिलीप साटम, आबा धुरी, नंदू घाडी, प्रकाश तेली,अमिता राणे, विकी गावडे, संकेत पवार,अमोल परब, महेश वेंगुर्लेकर, दीपक भोगले, संगिता कोकरे,राजन भोसले, प्रविणा परब आदी एसटी कामगार उपस्थित होते.


