You are currently viewing कणकवली पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर

कणकवली पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर

१६ पैकी ८ गण महिलांसाठी राखीव; जानवली गण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते कट, नव्यांना मिळाली संधी

 

कणकवली:

निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे कणकवली पंचायत समितीच्या सदस्यपदांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात आरक्षण सोडत काढण्यात आली. १६ गणांपैकी ८ गण महिलांसाठी राखीव झाले आहेत. महिलांसाठी राखीव झालेल्या गणांपैकी जानवली गण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते कट झाले असून नव्यांना संधी प्राप्त झाली आहे. कणकवली पंचायत समितीचे सभापतीपद हे ना.मा.प्र. महिलेसाठी यापूर्वीच राखीव झाले आहे.

पंचायत समितीच्या सदस्यपदांसाठी येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थित चिठ्ठयांद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार जानवली गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. अनुसूचित जातीच्या जागेसाठी मागील पडलेले आरक्षण विचारात घेऊन हा गण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला. त्यानंतर उर्वरित गणांपैकी ना.मा.प्र.साठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कलमठ, कासार्डे, नांदगाव, नाटळ हे मतदारसंघ ना.मा.प्रसाठी राखीव झाले आहेत. ५० टक्के महिला आरक्षणानुसार ना.मा.प्र.साठी राखीव झालेल्या गणांपैकी दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यासाठी चिठ्ठयांद्वारे सोडत काढण्यात आली. यात नांदगाव व नाटळ हे गण ना.मा.प्र. महिलांसाठी राखीव झाले आहेत.

उर्वरित ११ गणांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात बीडवाडी, लोरे, हरकुळ बुद्रुक, ओरसगाव, नरडवे हे गण महिलांसाठी राखीव झाले आहेत तर फोंडा-करूळ, खारेपाटण, वरवडे, हरकुळ खुर्द, तळेरे, कळसुली हे गण सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहेत. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठया विद्यामंदिरची विद्यार्थिनी देविश्री पाटील व विद्यार्थी पार्थ तेली यांनी काढल्या. आरक्षण सोडत काढण्याच्या प्रक्रियेवेळी नायब तहसीलदार मंगेश यादव, एम. पी. मंडले, महिला पोलीस विनया सावंत यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व सरपंचांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा