सावंतवाडीत गोमांस साठा उघडकीस
८० किलो मांसासह दाम्पत्य अटकेत
सावंतवाडी
शहरातील बाहेरचावाडा परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका घरातून सुमारे ८० किलो गोमांस जप्त केल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सरफराज बाऊद्दीन ख्वाजा (४५) आणि सनोबर बाऊद्दीन ख्वाजा (४०) या पती-पत्नीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलिसांनी ख्वाजा दांपत्याच्या घरावर छापा टाकला. छाप्यावेळी घर बंद ठेवून त्यांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जीपवरील ध्वनिव्यवस्थेच्या सहाय्याने सूचनाही दिल्या. दरवाजा उघडल्यानंतर सनोबर ख्वाजा हिने कैची हातात घेऊन आत्महत्येची धमकी देत प्रतिकार केला. मात्र महिला पोलिसांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती आटोक्यात आणली.
तपासादरम्यान घरातील फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले ८० किलो गोमांस आढळून आले. त्याचबरोबर मांस कापण्याची साधने, वजनकाटा, मोठा फ्रीझर आणि प्लास्टिक पिशव्या असा साहित्यासह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
घटनेनंतर सावंतवाडी शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कडक बंदोबस्त तैनात केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली.
