वेंगुर्ला नगरपरिषदेच्या आरक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; विवेक कुबल यांचे निवेदन
वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगरसेवक पदांच्या आरक्षणासंदर्भात अंमलात आलेल्या प्रक्रियेवर विवेक कुबल यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे मुख्याधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्टता मागितली आहे.
त्यांनी नमूद केले आहे की, एकूण २० जागांपैकी अनुसूचित जातीच्या १ जागेचा विचार केल्यास उरलेल्या १९ जागांमध्ये ५०% म्हणजेच १० जागा महिलांसाठी व ९ खुल्या गटासाठी असाव्या. मात्र, इतर मागासवर्गाच्या (OBC) ५ जागांपैकी २ जागा खुल्या गटात टाकल्याने खुल्या जागांची संख्या ७ वर आली आहे आणि यामुळे खुला गट ३५% व आरक्षित गट ६५% असा तफावत निर्माण झाला आहे. विवेक कुबल यांच्या मते, जर या २ OBC जागा महिला गटात समाविष्ट करून त्यात पुरुष व महिला दोघांचा समावेश केला असता, तर खुल्या जागांचे प्रमाण निदान ४५% राहिले असते.
ते पुढे म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५०% आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनाचा ही बाब संकेत देत आहे.
त्याशिवाय, OBC प्रवर्गाच्या जागांमध्ये लिंगनिरपेक्ष उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे महिलाही त्या २ जागांसाठी अर्ज करू शकतात. परिणामी महिलांसाठी आरक्षित जागांची एकूण संख्या ६०% पर्यंत जाते, असा मुद्दा त्यांनी मांडला आहे.
तथापि, त्यांनी भौगोलिक आणि लोकसंख्येच्या आधारे आरक्षणाचे वितरण संतुलित असल्याचे नमूद केले आहे.
सदर निवेदनाची प्रत तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.
