*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार यांच्या “मानस” काव्यसंग्रहाचे रवींद्र मालुंजकर यांनी केलेला पुस्तक परिचय*
*आशयसंपन्न विविधांगी रचना*
सातत्याने लेखन करत ‘साहित्य हाच ज्यांचा श्वास आहे!’ अशा ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सुमती पवार यांचा ‘मानस’ हा आशयसंपन्न आणि विविधांगी काव्यरचनांचा संग्रह पुण्याच्या अग्रगण्य वैशाली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे.
कवयित्रीचे हे तिसावे पुस्तक आहे. मनातल्या भावनांना तितक्याच तळमळीने व्यक्त करणाऱ्या कवयित्रीने या संग्रहातील कवितांमध्ये भक्ती, निसर्ग, सर्वसामान्य माणूस, लेखननिर्मिती, कवित्व, कुटुंबातील घटक अशा विविध विषयांना जाणीवपूर्वक स्पर्श केला आहे.
कवयित्रीला जसा नावीन्याचा ध्यास आहे; तसाच विविध संकल्प करण्याचा आणि ते संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार कवयित्रीच्या मनात डोकावतो. ‘संकल्प’ या कवितेत म्हणूनच कवयित्री म्हणतात-
*संकल्प असती जीवनातले थेंब अमृताचे*
*जीवनपटलावरी लिहावे गीतच संकल्पाचे!*
संग्रहातील मी झाड झालो, वसंत आला, भाकरीची किंमत, स्थितप्रज्ञता, नदी, लेक झाली, माझ्या कवितेने, खरे विद्यापीठ, हिरवाई अंथरली, फुंकर, अपयश, सुगी, आभाळ दाटल्यावर, कधी येशील भेटाया, वीर जवान, घर एक मंदिर अशा बऱ्याच कविता अधिक वाचनीय आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्यात्या प्रा.डॉ.प्रतिभा जाधव यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि युवा चित्रकर्ती रूपिका पाटील यांचे मुखपृष्ठ कविता संग्रहाच्या समृद्धीत भर घालणारे आहे.
कवयित्री आपल्या गत आयुष्याकडे वळून बघते; तेव्हा गतकाळातील अनेक आठवणींचा फुलोरा फुलत जातो. ‘बघता वळून मागे’ ही या संग्रहातली अतिशय महत्त्वाची कविता आहे. त्या म्हणतात-
*बघता वळून मागे, मम आठवांचा झुला*
*मी नाही-नाही म्हणता, क्षणात गगनी गेला*
कवितेच्या प्रांतात या संग्रहाचे निश्चितच स्वागत होईल.
*मानस*
*कवयित्री: प्रा.सुमती पवार*
*वैशाली प्रकाशन, पुणे*
*किंमत-१८०/-*
*९४२३०९०५२६*

